विट्यात दहा किलोच्या गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

विट्यात दहा किलोच्या गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात तब्बल दोन लाख रुपयांचा १० किलो गांजा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनासह एकूण साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल विटा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विटा शाखेच्यावतीने करण्यात आली.

राज्याचे पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात १२ ते २१ सप्टेंबर या दरम्यान अवैध गांजा लागवड आणि विक्री विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना गांजा विक्री करणारे, गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेवून कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी आज, मंगळवारी सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि पोलीस पथकाने खानापूर तालुक्यात कारवाई सुरू केली.

सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सुर्यवंशी यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, कराड येथील गोरख पवार हा निळसर रंगाची चारचाकी वाहनातून (नं. एम एच ०२ बी वाय ४०८६) गांजा माल विक्रीसाठी विट्यातील नेवरी नाका येथून कराड रस्त्यावर येणार असलेची टीप मिळाली. त्यानुसार येथील नेवरी नाक्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, त्यांचे पथक आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक यांनी मिळून सापळा लावला. त्यावेळी एक निळसर रंगाचे वाहन कराड रस्त्यालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर थांबल्याचे दिसले. याबाबत संशय आल्याने त्या ठिकाणी जावून वाहनाची तपासणी केली असता मागील डिकीमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये निळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या पिशवीत खाकी चिकट टेपने गंडाळलेली ४ पाकिटे आणि पेपरच्या कागदात गुंडाळलेली काळपट हिरवट रंगाची गांजा वनस्पती मिळाली. याबाबत अधिक चौकशी केली असता वाहनामधील गोरख जिजाबा पवार (वय ४६ रा. वडोली निळेश्वर ग्रामपंचायतजवळ, ता. कराड जि. सातारा) हा व्यक्ती होता. त्याने हा गांजा हा विक्री करीता आणल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्याकडील १० किलो वजनाचा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल आणि अडीच लाख रुपयांची संबंधित वाहनअसा एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोरख पवार यांच्या विरुध्द विटा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिक ८ (क) २२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button