अरविंद सावंत, अनिल देसाई, राहुल शेवाळे यांचे अर्ज दाखल | पुढारी

अरविंद सावंत, अनिल देसाई, राहुल शेवाळे यांचे अर्ज दाखल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या दोन्ही पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरलेल्या दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत (ठाकरे) आणि दक्षिण मध्य मुंबई येथून राहुल शेवाळे (शिंदे गट) व अनिल देसाई (ठाकरे) या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी सोमवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुती व महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत निवडणूक हालचाली वाढल्या आहेत. राज्यात पाचव्या टप्प्यात 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 3 मे 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, महाविकास आघाडीने उत्तर मुंबईत, तर महायुतीने उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबईत अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

दरम्यान, राहुल शेवाळे यांनी आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप आमदार कालिदास कोळंबकर, तमिल सेल्वन आदी उपस्थित होते. यावेळी शेवाळे यांच्या समर्थकांनी जीपीओ ते मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी खा. शेवाळे यांनी दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनीही उमेदवारी अर्ज भरले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे आमदार अमिन पटेल, भाई जगताप, विधान परिषद सदस्य कपिल पाटील आदी उपस्थित होते. अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी दक्षिण मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जहांगीर कला दालन ते मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हातात पक्षचिन्ह घेऊन निघालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिलेल्या घोषणांनी येथील परिसर दणाणून सोडला.

उपनगरांत आज शक्तिप्रदर्शन

मुंबई शहरातील उमेदवारांनी सोमवारी अर्ज सादर केल्यानंतर मुंबई उपनगरांत शक्तिप्रदर्शनाची तयारी पक्षांकडून करण्यात येत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल हे उद्या, मंगळवारी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि उत्तर पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील हेसुद्धा मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक बडे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button