सांगली : कोयनेतून पाणी सोडले : पुराची शक्यता | पुढारी

सांगली : कोयनेतून पाणी सोडले : पुराची शक्यता

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे गुरुवारी कोयना धरणातून 2100 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात 85.21 टीएमसी पाणीसाठा आहे. पर्जन्यमानामध्ये वाढ झाल्यास उद्या (शुक्रवार) दि. 12 रोजी कोयना धरणातून आठ हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रात प्रतिसेकंद एकूण 10 हजार 100 क्यूसेक पाणी येणार आहे. परिणामी कृष्णा, कोयना नदीकाठाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोलीतूनही 9400 क्यूसेेक विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी वाढ होत आहे. दरम्यान, अलमट्टीतून दोन लाख विसर्ग सुरू आहे. पण यात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे.

धरण परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी, गुरुवारीही पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू होती. गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सकाळी आठवाजेपर्यंत कोयना येथे 192 मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच नवजाला 112, महाबळेश्‍वरला 188 मिमी पाऊस झाला. धोमला 41, कण्हेरला 40 मिमी असा जोरदार पाऊस पडला. तसेच गुरुवारी दिवसभर कोयना येथे 69, धोममध्ये21, कण्हेर याठिकाणी 15, नवजामध्ये 29, महाबळेश्‍वर याठिकाणी 63 मिमी असा उच्चांकी पाऊस सुरुच आहे. यामुळे धरणात प्रतिसेंकद 60 ते 70 हजार क्यूसेक पाणी येत आहे. परिणामी मागील 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे. चार दिवसात धरणात दहा ते बारा टीएमसी पाणी वाढले आहे. धरण सध्या 85.21 टीएमसी (81 टक्के) भरले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर उद्या (शुक्रवारी) दुपारी तीन वाजता धरणाचे वक्रदरवाजे एक फूट सहा इंच उघडून त्यातून प्रतिसेंकद 8 हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीत एकूण दहा हजार क्यूसेक पाणी येणार आहे. तसेच नदीच्या आसपासच्या गावे, शिवार, ओढे, नाल्यातील पाणीही नदीत येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी वाढण्याची शक्यता आहे. कण्हेर धरणातूनही 8 हजार 444 क्यूसेक पाणी सोडणे सुरू आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी उशिरा विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी बुधवारपेक्षा दोन ते चार फुटांनी वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता कृष्णा पूल (कराड) येथे 19 फूट, बहे पूल येथे 10, ताकारीत 29, भिलवडीत 27.5, आयर्विन पूल (सांगली) 28 व अंकली पूल (हरिपूर) 33 फूट पाणी पातळी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवार सायंकाळपर्यंत यात आणखी दोन ते तीन फूट वाढ होईल. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील नदीकाठची गावे, रस्ते व सांगली शहरातील काही भागात शनिवारी पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे.

चांदोलीत 31.34 टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरुच आहे. गेल्या 24 तासात येथे 112 व दिवसभरात 38 मिमी पाऊस पडला. धरणात 11 हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. वारणा धरणात 31.34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातून बुधवारपासून 9400 क्यूसेक पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी वाढतच आहे. उद्यापर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागातील रस्ते, पूल, बंधारे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

विविध धरणांतील पाणीसाठा (कंसात क्षमता)

कोयना : 85.21 (105.25), धोम : 11.24 (13.50), कण्हेर : 8.75 (10.10), चांदोली : 31.34 (34.40), अलमट्टी : 111.64 (123). अलमट्टी धरणात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख 31 हजार 30 क्यूसेक पाणी जात आहे, तर धरणातून पुढे दोन लाख क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांची वारणा धरणाला भेट देऊन पाहणी

शिराळा तालुक्यात जोरदार पडणार्‍या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वारणा धरण येथे भेट देऊन पाहणी केली. धरण क्षेत्रातून करण्यात येणार्‍या विसर्गाबाबत धरणातील पाणी पातळी, पाऊस, अतिवृष्टी कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व संबंधितांना दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. दयानिधी यांनी यावेळी दिल्या.

यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, वारणा उपअभियंता मिलिंद किटवाडकर, शिराळा वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे सोबत उपस्थित होते.

Back to top button