सुतगिरण्या व यंत्रमाग उद्योग धोक्यात ! आगामी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न | पुढारी

सुतगिरण्या व यंत्रमाग उद्योग धोक्यात ! आगामी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न

विटा; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कापूस दरवाढ तसेच अपुऱ्या पुरवठ्यामुळे सुतगिरण्या व यंत्रमाग उद्योग धोक्यात आले आहेत. याबाबत विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

कापूस दरातील अस्थिरतेमुळे संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीत उत्पादन कपातीची अभूतपूर्व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. या संबंधात सोलापूरच्या वस्त्रोद्योजकगट कार्यालयाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन, विटा यंत्रमाग सहकारी संस्था आणि सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ या संस्थांना तात्काळ सविस्तर माहिती देण्यात आली.

याबाबत संबंधित संस्थांना वस्त्रोद्योग कार्यालयाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडून स्वतंत्ररित्या पत्रे पाठवण्यात आली आहेत. या पत्रात म्हटले आहे की, आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या वस्त्रोद्योग विभागाचे प्रश्न महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाने विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक ४७२३० ने स्विकृत केला आहे. संबंधीत पत्राद्वारे ही माहीती कार्यालयास कळविण्यात आलेली आहे. या तारांकित प्रश्नाची उत्तरे २१ जुलै २०२२ चर्चिली जाणार आहेत.

यामध्ये राज्यात कापूस दरवाढ तसेच अपुरा पुरवठा झाल्याने सुतगिरण्या आणि यंत्रमाग उद्योग धोक्यात आल्याचे २३ मे २०२२ च्या सुमारास निदर्शनास आले. हे खरे आहे काय ? या दरवाढीमुळे सर्व सुतगिरण्या व यंत्रमाग, कारखाने कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय ? राज्यात कापसाचे दर तसेच पुरवठा नियमित होईपर्यत सहकारी व खाजगी सुतगिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहिर करावा अशी मागणी अनेक सुतगिरण्या चालकांनी वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडे केली. हे ही खरे आहे काय? आणि केली असल्यास, या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे ? आणि जर केली नसेल तर त्या विलंबाची कारणे काय आहेत? या प्रश्नांवर दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन, विटा यंत्रमाग सहकारी संस्था आणि सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ या संस्थांनी तात्काळ सविस्तर माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

Back to top button