पुणे : संततधारमुळे बांगरवाडी शिवार झाले हिरवेगार | पुढारी

पुणे : संततधारमुळे बांगरवाडी शिवार झाले हिरवेगार

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : जूनमधील संततधार पावसामुळे बांगरवाडी (ता. जुन्नर) शिवारातील डोंगरांवर हिरवा गालिचा पसरण्यास सुरुवात झाली आहे. हिरवेगार डोंगर, आकाशात ढगांची गर्दी, रानपाखरांचा थवा, असे मनमोहक चित्र पर्यटकांना मोहित करीत आहे.

बांगरवाडी परिसरात शहरी पर्यटकांची भ्रमंती सुरू झाली आहे. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे परिसराचे रूप पालटू लागले आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांसह औषधी वनस्पती, वनराईत नागमोडी वळणाच्या पाऊलवाटा, मोर, लांडोर, कोकीळ अशा विविध पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाची साद, तरस, लांडगा, कोल्हा अशा वन्यजीवांचे दर्शन असलेल्या वैभवाच्या खुणा खुणावत आहेत.

अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण झाल्याने बांगरवाडी परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढला. ‘राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का…’ या गाण्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद पर्यटक घेत आहेत. बांगरवाडीच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या डोंगरांवर दावलमलिक बाबाचा दर्गा आणि बाळेश्वराच्या दर्शनाला भाविक दर गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी मोठी गर्दी करतात.

दरम्यान, जुन्नर तालुका राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर बांगरवाडीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या भुयारातील गुप्त विठोबा मंदिर पर्यटकांना आकर्षित करीत आहे. मंदिरातील स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. निसर्गाच्या रम्य वातावरणाचा हा परिसर पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे.

Back to top button