मुगाव शाळेतील दप्तर चोरीचा प्रयत्न, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा | पुढारी

मुगाव शाळेतील दप्तर चोरीचा प्रयत्न, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

देऊळगाव राजे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत हिंगणी बेर्डी (ता. दौंड) अंतर्गत येणार्‍या मुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून शाळेचे दप्तर चोरी करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दि. 2 ते 4 जुलै दरम्यान घडली. दरम्यान, शाळेचे दप्तर चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्कांना जोर आला आहे.

सोमवारी (दि. 4) उपशिक्षक इनामदार शाळेत आले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलिस पाटील राधिका ढवळे, सरपंच मनीषा यादव, ग्रामपंचायत सदस्य विकास ढवळे, प्रवीण ढवळे यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. हे सर्वजण ताबडतोब शाळेत उपस्थित झाले. पोलिस पाटील राधिका पाहणे यांनी फोन करून सदर घटनेची माहिती दौंड पोलिसांना दिली. घटनास्थळी उपस्थितांनी शाळेच्या कार्यालयाची पाहणी केली असता शाळेचे दप्तर (रेकॉर्ड) चोरी झालेचे निदर्शनास आले.

त्यानंतर ते इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केला असता जवळच असलेल्या मुगाव पुनर्वसनच्या पाण्याच्या टाकीत कागदपत्रांचे तीन-चार गाठोडे व काही साहित्य आढळून आले. पोलिस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने सर्व साहित्य वर काढण्यात आले. सुदैवाची बाब म्हणजे पाण्याची टाकी रिकामी होती. त्यामुळे साहित्याचे नुकसान झाले नाही.

दरम्यान, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी सरपंच मनीषा यादव, विकास ढवळे, बाळासाहेब बागल, भानुदास खोमणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम गायकवाड, माऊली वाटाणे यासह अनेक ग्रामस्थ
उपस्थित होते. शाळेमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेबाबत सरपंच, पोलिस पाटील, दौंड पोलिस आणि दौंडचे गटशिक्षणाधिकारी यांना संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात दिली आहे, अशी माहिती उपशिक्षक सी. एच. इनामदार मुगाव यांनी दिली.

Back to top button