पृथ्वीराज देशमुख यांना विधान परिषदेवर संधी? | पुढारी

पृथ्वीराज देशमुख यांना विधान परिषदेवर संधी?

कडेगाव; संदीप पाटील :  राज्यात शिंदे व फडणवीस सरकार सत्तेवर आल्याने पलूस-कडेगाव मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. सध्या भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

पृथ्वीराज देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. तसेच गेल्या काही दिवसात सत्ता बदलानंतर जिल्ह्यात व मतदारसंघात भाजप नेत्यांत मोठी अस्वस्था निर्माण झाली होती. असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.अशा परिस्थितीत त्यांनी पलूस – कडेगाव मतदारसंघात भाजप एकसंघ राखण्याचे काम केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता संपादन करीत भाजपचे कमळ फुलविले. जिल्ह्यातील नेत्यांची एकत्रित मोट बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या राज्यपाल नियुक्‍त बारा आमदारांच्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तविली जात आहे.

पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख हे मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळे पलूस-कडेगावमधील भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा सध्या मुंबईला लागून राहिल्या आहेत. त्यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळाल्यास पलूस – कडेगाव मतदार संघात पुन्हा नवे राजकीय पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या या राजकीय बदलाचा परिणाम पलूस – कडेगावच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी काही दिवसातच जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. या येणार्‍या सर्व निवडणुका मोठ्या चुरशीच्या व रंगतदार होणार हे निश्चित आहे. तसेच माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देशमुख गटाला बळ दिले जाण्यासाठी त्यांच्या आमदारकीची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे.

Back to top button