सांगली : जत तालुक्यातील वृक्षतोडीच्या वृत्ताची सयाजी शिंदेंकडून दखल | पुढारी

सांगली : जत तालुक्यातील वृक्षतोडीच्या वृत्ताची सयाजी शिंदेंकडून दखल

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयावर दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवला होता. पर्यावरणप्रेमी प्रसिद्ध अभिनेते, सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या व्हाट्सअ‍ॅपच्या स्टेटसला दै. पुढारीची बातमी झळकली. त्यांनी पर्यावरण प्रेमींना वृक्ष संवर्धनाचा संदेश या बातमीच्या माध्यमातूनही दिला.

गुरुवारी दिवसभर अनेक वाचकांच्या स्टेटसवर, सोशल मीडियावर ही बातमी सामायिक झालेली होती. सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेतून वाळेखिंडी येथे अपूर्वा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात सुमारे 372 झाडांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांची चांगल्या पद्धतीने जोपासनाही केली आहे. अगदी स्मशानभूमीमध्येही वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन केले आहे.

सयाजी शिंदे हे राज्यात हजारो वृक्षांची लागवड व संगोपन करत आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची देश पातळीवर दखल घेतली आहे. सह्याद्री देवराईचा वृक्ष पुनर्रोपण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे कालांतराने खालावलेली भूजल पातळी वाढेल आणि समाजाची सामाजिक-आर्थिक वाढ होईल. स्वदेशी झाडे लावून त्यांचे संवर्धन करून पुन्हा हिरवे जंगल बनवणे हा त्यांचा उदात्त हेतू आहे.

Back to top button