सांगली : ‘सिव्हिल’ची इमारत कोसळण्याचा धोका | पुढारी

सांगली : ‘सिव्हिल’ची इमारत कोसळण्याचा धोका

सांगली सचिन लाड : येथील ‘सिव्हिल’ रुग्णालयाची जुनी इमारत केव्हाही कोसळू शकते, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने साडेचारशे रुग्णांना नवीन बाह्यरुग्ण विभागात हलविण्यात आले आहे. पावसाळ्यात मोठा धोका असल्याचा निर्वाळाही या विभागाने दिला आहे. यामुळे या इमारत परिसरात सध्या कोणालाही थांबून दिले जात नाही.

‘सिव्हिल’च्या इमारतीला ५० वर्षे झाली आहेत. सन 1१९७२ मधील हे बांधकाम आहे. गोरगरिबांचा आधार म्हणून ‘सिव्हिल’चा लौकिक आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील रुग्ण येथे दाखल होतात. जुन्या इमातीमध्ये शंभर बेडची क्षमता होती. मात्र प्रत्यक्षात २४० रुग्णांना दाखल करून उपचार केले जात होते. चार मजली ही इमारत आहे. रुग्णालयातील प्रत्येक वार्डाला लागूनच शौचालय आहे.

इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. छताच्या स्लॅबचे ढलपे पडत आहेत. त्यामुळे सळ्या दिसत आहेत. पिलरच्या सळ्याही दिसू लागल्या आहेत. खिडक्या मोडल्या आहेत. पावसाळ्यात तर प्रत्येक वार्डात आणि पोर्चमध्ये स्लॅबमधून पाणी गळते. दोन वर्षांपूर्वी इमारतीची दुरुस्ती करण्यात आली होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीची पूर्णपणे पाहणी केली. त्यावेळी त्यांना ही इमारत केव्हाही कोसळू शकते, हा अंदाज व्यक्त करण्यात आला. रुग्णालयात पाणीपुरवठा करणारी टाकीही परिसरात आहे. तीही कोसळण्याची भीती असल्याची सूचना बांधकाम विभागाने केली आहे. सर्व रुग्णांना तातडीने नवीन बाह्यरुग्ण विभागात हलविण्याची या विभागाने सूचना केली. प्रशासनाने ४५० रुग्णांना नवीन बाह्यरुग्ण विभागात हलविले. नवीन विभागही रुग्णांसाठी कमी पडत आहे. त्यांना सेवा देताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

साडेचारशे रुग्णांना हलविले : पावसाळ्यात धोका; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल

अतिदक्षता विभाग कमी पडू लागला

जुन्या इमारतीत सर्व सोयींनी सुसज्ज असा 12 रुग्णांच्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग होता. तोही आता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नवीन बाह्यरुग्ण विभागातील अतिदक्षता विभाग 25 रुग्णांच्या क्षमतेचा आहे, पण वाढत्या रुग्ण संख्येमुळे तोही कमी पडू लागला आहे. गंभीर रुग्णांना ठेवता येईना, अशी परिस्थिती आहे. नाईलजास्तव मग या रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.

शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज…

‘सिव्हिल’चा परिसर 32 एकर आहे. यामध्ये जुन्या इमारतीचे बांधकाम सात एकरात आहे. नवीन बाह्यरुग्ण विभागाचे बांधकाम 12 एकरात विस्तारीत करण्यात आले आहे. आता सध्या 19 एकर जागा मोकळी आहे. या जागेत पाचशे बेडच्या क्षमतेचे नवीन रुग्णालय करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. यासाठी शासनानेही सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

हेही वाचा

Back to top button