नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत चढ- उतार सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,७८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८,५३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ७६,७०० वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे देशातील कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ४.३२ वर गेला आहे. आतापर्यंत देशात १९६ कोटी १८ लाख ६६ हजार ७०२ लसीचे डोस देण्यात आले आहेत.
रविवारी संपलेल्या २४ तासांत १२,८९९ रुग्ण आढळून आले होते. तर १५ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शनिवारी १३,२१६ रुग्ण आढळले होते. गेल्या आठवडाभरात सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रातील आठवड्यातील एकूण रुग्णसंख्या २५ हजारांवर पोहोचली. महाराष्ट्रात आठवडाभरात ४५ टक्के रुग्णवाढ झाली आहे. याआधीच्या आठवड्यात राज्यात १७,३८० रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या आठवडाभरात २५,१७२ रुग्ण आढळून आले आहेत.
देशात १३ ते १९ जून दरम्यान ७९,२५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीच्या आठवड्यात ४८,७६९ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवड्याभरा झालेली रुग्णवाढ ही फेब्रुवारी नंतरची सर्वाधिक आहे. २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ८६ हजार नवे रुग्ण आढळून आले होते.
दरम्यान, कोरोनाशी (COVID19) लढा देण्यासाठी लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारी लस उपलब्ध होणार आहे. भारत बायोटेकने या लसीबाबत तिसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. या लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून लवकरच ग्रीन सिग्नल मिळू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. (bharat biotech covid19 nasal vaccine)
कोरोना विषाणू पुन्हा एकदा हळूहळू पाय पसरत आहे. पण आता याच्याशी लढण्यासाठी जगात अनेक लसी उपलब्ध आहेत, ज्या विषाणूवर प्रभावी आहेत. या यादीत लवकरच भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीचे नाव जोडले जाऊ शकते.
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीची तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. कंपनी पुढील महिन्यात आपला डेटा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडे सादर करेल.