सांगली : शिक्षण समितीच्या मनमानीमुळे संघात प्रवेश | पुढारी

सांगली : शिक्षण समितीच्या मनमानीमुळे संघात प्रवेश

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर कमी करावा, यासाठी समितीत राहून वारंवार आवाज उठविला. मात्र समितीचे नेते श्री. मिरजकर आणि त्यांच्या टोळीने माझा आवाज दाबला. व्याजदर कमी करण्याचा विषय काढला की ते माझ्याकडे रागाने पाहतात, असा घणाघाती आरोप करीत शिक्षक समितीचे नेते व वरिष्ठ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ वायदंडे यांनी कार्यकर्त्यासह प्राथमिक शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला.

यावेळी सदाशिवराव मोहिते, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अंकुश पंडित, प्रकाश सुतार, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत, शिक्षक सोसायटीच लक्ष्मणराव गायकवाड, अण्णाराव पाटील, प्रल्हाद हुवाळे, संतोष काटे, शिक्षक संघाचे
उपाध्यक्ष बसवराज येलगार आदी उपस्थित होते.

श्री. वायदंडे म्हणाले, समितीत राहून मी जातीयवादाचे चटके सहन केलेे आहेत. विनायकरावांसारख्या माणसावर हे जातीयवादाचे आरोप करतात. यात काहीही दम नाही. विनायकरावांचा जिल्ह्यासह राज्यात चांगला लौकिक आहे. सेटलमेंटच्या अफवा पसरवून सभासदांना संभ्रमीत केले जात आहे. स्वाभिमानी पॅनेलचे सर्व उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याने सर्वांचा विजय निश्चित आहे.
रमेश पाटील म्हणाले, विनायकराव हे सरळ आणि उमद्या मनाचा नेता आहे. लाव्यालाव्या करणे, गोड बोलून विश्वासघात करणे यात समितीचा हातकंडा आहे.

संजय कोळी म्हणाले, स्वाभिमानी पॅनेलला कोणी विरोधकच नाही. त्यामुळे स्वाभिमानीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. यावेळी बाळासाहेब जगताप, सुभाष जाधव यांच्यासह स्वाभिमानी पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button