सांगली : तलवार हल्ल्यात तीन जखमी | पुढारी

सांगली : तलवार हल्ल्यात तीन जखमी

जत : पुढारी वृत्तसेवा

जाडरबोबलाद (ता. जत) येथील तिघांवर तलवारींनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री लवंगी (ता. मंगळवेढा) येथे झाली. हल्ल्यात विठ्ठल रामचंद्र बरूर, दयानंद मल्लेशप्पा बरूर व महादेव रामचंद्र बरूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा हात तोडला आहे. तिघांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी रात्री उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक माने यांनी तातडीने भेट दिली. जखमींना तात्काळ मिरजेत दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून मंगळवेढा पोलिसांनी तलवार जप्त केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : जाडरबोबलाद येथील विठ्ठल रामचंद्र बरूर, त्यांचे भाऊ व अन्य एकजण नंदूर ( ता. मंगळवेढा) येथे एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारसाठी गेले होते. हल्लेखोर वाटेत दबा धरून बसले होते. विठ्ठल ,दयानंद व महादेव बरूर मोटरसायकलवरून जात असताना लवंगी येथे त्यांच्यावर अज्ञातांनी तलवारींनी जोरदार हल्ला केला. त्यात एकाचा हात तोडला ,तर दुसर्‍याचा हात लोंबकळत होता. तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला त्याचा पोलिस तपास करीत आहेत.

उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीपासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर लवंगी गाव आहे. तपास मंगळवेढा पोलिसाकडे आहे. मात्र हल्लेखोरही जत तालुक्यातील असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सोमवारी रात्री उशिरा मंगळवेढा पोलिस सांगलीच्या रुग्णालयात जखमींचे जबाब घेतले.

जमीन वादातून हल्ला?

हल्लेखोर व जखमी यांच्यात मागील महिन्यापासून जमिनीच्या विषयावरून वाद सुरू आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात शेतात नांगर घालण्याच्या कारणातून वाद झाला होता. या कारणावरूनच हल्ल्याची ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Back to top button