सांगलीत काँग्रेसची जीत; बळ वाढले ‘विश्वजित’चे | पुढारी

सांगलीत काँग्रेसची जीत; बळ वाढले ‘विश्वजित’चे

सांगली : उध्दव पाटील

महानगरपालिकेच्या प्रभाग ‘16 अ’च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला. काँग्रेसअंतर्गत कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम गटाचे बळ या विजयाने वाढले आहे. महापालिकेच्या राजकारणात या गटाची बेरीज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत विविध गटांचे सावध राजकारण पहायला मिळेल, असे संकेत मिळत आहेत. मोठ्या फरकाने झालेला पराभव भाजपची चिंता वाढवणारा ठरला आहे. दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच पक्ष, गटतट यांची कसोटी लागणार आहे.

महापालिकेचा प्रभाग क्रमांक सोळा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र सन 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातील चारपैकी दोन नगरसेवक भाजपचे निवडून आले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास मोठे भगदाड पाडण्यात भाजपला यश आले. मात्र प्रभाग ‘16 अ’च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग 16 मधील जनमताचा कल पुढे आला आहे. काँग्रेसचा मोठा विजय भाजपला विचार करायला लावणारा आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रभागात विविध ठिकाणी बैठका, मतदारांशी संवाद साधत प्रचारात रंग भरला होता. मात्र अमोल गवळी यांना विजय प्राप्त करता आला नाही. सहानुभूतीची लाट आणि मतदानाचा कमी टक्का या कारणांकडे लक्ष वेधून भाजपला हात झटकता येणार नाहीत. भाजपअंतर्गत गटातटाच्या राजकारणाची चर्चाही यानिमित्ताने पुढे आली आहे.

डॉ. कदम यांचे वाढते वर्चस्व

दोन महिन्यांपूर्वी स्वीकृत नगरसेवक निवडीत डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘व्हेटो’ वापरून पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली. ‘16 अ’च्या पोटनिवडणुकीतही तौफिक शिकलगार यांना आपल्या वर्तुळात ओढून आणि लागेल ते बळ पुरवून जिंकून आणण्यात ‘टीम विश्वजित’ यशस्वी झाली आहे. मदनभाऊ गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिकलगार हे पोटनिवडणुकीत ‘टीम विश्वजित’चे म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रभागात काँग्रेसच्या प्रचारासाठी जयश्री पाटील फिरल्या; पण मदनभाऊ युवा मंचने पुरेसे सक्रिय होणे टाळल्याची चर्चाही त्यातूनच पुढे आली आहे. काँग्रेसमधील गटातटाची चर्चा झाली, पण त्याचा परिणाम मतदानामध्ये दिसून आला नाही. उलट काँग्रेसला मतदारांनी भरभरून मते दिली.

साखळकर बॅकफूटवर

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश सावंत यांच्यामागे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक उत्तम साखळकर यांचे बळ होते. यापूर्वी सामना करावा लागलेल्या अंतर्गत विरोधातून त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगितले जात होते. महापालिकेच्या सन 2018 च्या निवडणुकीत या प्रभागातील विजयी चार उमेदवारांमध्ये साखळकर यांना मिळालेली मते लक्षणीय होती.

माजी महापौर हारूण शिकलगार यांच्यापेक्षाही त्यांना अधिक मते मिळाली होती. त्यामुळे सावंत यांची उमेदवारी तगडी मानली जात होती. सावंत यांची उमेदवारी भाजपच्या मतविभागणीसाठी असल्याची चर्चा मतदानाच्या अगोदर एक-दोन दिवस जोरात होती. या सार्‍याचा परिणाम म्हणून डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत कमी मते सावंत यांना मिळाली.

‘आघाडी’ची बाजी

डॉ. विश्वजित कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मयूर पाटील, फिरोज पठाण, अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, अमर निंबाळकर तसेच नगरसेवक व कार्यकर्ते काँग्रेसच्या विजयासाठी राबले. काँग्रेसला राष्ट्रवादीची मोलाची साथ लाभली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रभागात प्रचार बैठका घेतल्या. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, सागर घोडके, उमर गवंडी यांनी समर्थकांची फळी शिकलगार यांच्या पाठीशी भक्कम उभी केली. त्यामुळे काँग्रेसला मोठ्या विजयाला गवसणी घालता आली.

स्वीकृत निवड ठरवली योग्य

तौफिक शिकलगार यांना डॉ. कदम गटाकडे झुकवणे आणि शिकलगार यांच्या निवडणुकीची सुत्रे हातात घेऊन विजयासाठी किल्ला लढवणे यामध्ये डॉ. कदम यांचे कट्टर समर्थक नगरसेवक मयूर पाटील यशस्वी झाले आहेत. डॉ. कदम यांनी पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता मयूर पाटील यांना स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी प्रदेशस्तरावर वजन खर्च केले होते. स्वीकृत नगरसेवक म्हणून केलेली निवड मयूर पाटील यांनी पोटनिवडणुकीत सार्थ ठरवली आहे. सांगलीत ‘टीम विश्वजित’चे बळ वाढवले आहे. तसेच सांगलीत ‘टीम विश्वजित’चे नेतृत्व मयूर पाटील यांच्याकडे आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘करेक्ट कार्यक्रम’साठी ‘करेक्ट साथ’

महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या साथीने भाजपचा नामुष्कीजनक पराभव केला. मात्र महापालिकेत गेल्या अकरा महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सूर फारसे जुळले नाहीत. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला ‘करेक्ट साथ’ दिली. पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्या

समर्थक कार्यकर्त्याला मिळाली. पवार गटाचा आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा सवतासुभा आहे. पवार गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला ‘करेक्ट साथ’ दिली असावी. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडून उमर गवंडीच्या रूपाने एका जागेवर हक्क सांगितला जाण्याचेही संकेत मिळत आहेत. ‘सेफ’ प्रभागात एक जागा पदरात पाडून घेण्याचे कसब राष्ट्रवादीकडून साधले जाण्याचे संकेत आहेत.

Back to top button