कवठेमहांकाळ : गोरख चव्हाण
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवत झेंडा फडकविला. शेतकरी विकास आघाडीला सहा जागांवर समाधान मानावे लागले. राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवल्यामुळे राष्ट्रवादीची एक्स्प्रेस सुसाट सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या निमित्ताने राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी एंट्री केली आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजय पाटील महांकाली उद्योग समुहाच्या अध्यक्षा अनिता सगरे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन कोठावळे आणि काँग्रेस यांनी एकत्र येत शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील सर्वच प्रभागांत आघाडीचे उमेदवार उभे केले.
तर राष्ट्रवादीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर लढण्याची भूमिका घेतली. सर्वच प्रभागात पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे केले. निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. एकीकडे शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरस निर्माण झाली असताना दुसरीकडे भाजप, आरपीआय तसेच बसपा आणि अपक्षांनीही निवडणुकीत दंड थोपटल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती.
राष्ट्रवादीने 17 पैकी 10 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. शेतकरी विकास आघाडीला सहा जागांवर समाधान मानावे लागले. शहरात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग आठमध्ये अपक्ष उमेदवार रणजीत घाडगे यांनी विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा युवा नेते रोहित आर. आर. पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी सांभाळली होती. त्यामुळे शहरातील मतदारांनी राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली. शेतकरी विकास आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजय पाटील, युवा नेते राजवर्धन घोरपडे, शंतनू सगरे, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे, गजानन कोठावळे आणि काँग्रेस यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. भाजप व आरपीआयनेही उमेदवार दिले होते. या निमित्ताने रोहित पाटील यांनी दमदार 'एंट्री' केल्याचे स्पष्ट झाले आहे.