तळीये कोंढाळकर कोंड ग्रामस्थांचे विघ्नहर्त्याला साकडे! - पुढारी

तळीये कोंढाळकर कोंड ग्रामस्थांचे विघ्नहर्त्याला साकडे!

महाड; श्रीकृष्ण द. बाळ : गावावर आलेल्या भीषण संकटातून बाहेर काढून भविष्यकाळात सर्वांना सुखाचे समाधानाचे दिवस दाखव असे साकडे तळीये कोंढाळकर कोंड ग्रामस्थांनी काल विघ्नहर्त्याच्या आगमनाप्रसंगी घातले.

महाड तालुक्यातील तळीये कोंढाळकर कोंड येथील २२ जुलैच्या मध्यरात्री सुमारे ४५ कुटुंबावर दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेत सुमारे ८९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. मागील एक महिन्यापासून येथील सर्व कुटुंबातील नागरिक आपल्या तालुक्यातील विविध नातेवाईकांकडे आश्रयास गेले होते.

या दुर्घटनेनंतर तातडीने राज्य शासनाकडून संबंधित सर्व ग्रामस्थांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था गावाच्या हद्दीतच करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार चार दिवसांपूर्वीच स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत २४ पैकी १२ जणांना शासनामार्फत देण्यात आलेल्या कंटेनरचा लाभ मिळाला आहे. यामध्ये सुमारे चाळीस कुटुंबीय राहत आहेत.

यात मंगेश तुळशीराम शिरावले, सखाराम रंगोजी कोंढाळकर, विठ्ठल देवजी जाधव, बबन यशवंत सकपाळ, सखाराम विठ्ठल गंगावणे, दिलीप शिवराम कोंढाळकर, शेवंता नंदू कोंढाळकर, पूजा बाळकृष्ण कोंढाळकर, रामचंद्र जिवाजी गंगावणे, शकुंतला राजाराम गंगावणे, भीमसेन काशीराम शिरावले व संध्या सुधाकर कोंढाळकर या कुटुंबीयांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.

तळीयेमध्ये गणेश मुर्तीची (विघ्नहर्ता) प्रतिष्ठापणा

यानंतर या घडलेल्या घटनेवर मात करत १२ कुटुंबियांच्या वतीने भीमसेन काशीराम शिरावले यांच्या कंटेनरमध्ये गणेश मुर्तीचे (विघ्नहर्ता) प्रतिष्ठापणा करून गावांवरील अरिष्ट कायमस्वरूपी दूर करण्याचे साकडे घातले.

या संदर्भात भीमसेन स्थिरावले व किशोर पोळ यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, गावावर आलेल्या संकटातून भविष्यकाळात सर्वांना सुखाचे समाधानाचे दिवस विघ्नहर्त्या आमच्या सर्व ग्रामस्थांवर यावेत म्हणून आशीर्वादाचे साकडे घातल्याची माहिती दिली.

शुक्रवारी (दि.१०) रोजी सकाळी या सर्व कुटुंबियांनी गणरायाचे एकत्रितपणे स्वागत करून भीमसेन शिरावले यांच्या घरात त्याची स्थापना केली. दीड दिवस मंगलमूर्ती आपल्या घरी राहणार असल्याची माहिती भीमसेन शिरावले यांनी दिली. सायंकाळी उशिराने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणवासीयांचे आराध्य दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्याचे आगमनानंतर आलेली सर्व संकटे दूर होतात. या विश्वासालाच ग्रामस्थांनी साथ देत आपल्या गावावर आलेल्या भीषण संकटातून बाहेर पडण्यासाठी गणरायाला साकडे घातले.

हेही वाचलंत का?

Back to top button