रोबोटिक्स अभियंत्यांची आरोग्य क्षेत्रात वाढणार डिमांड! | पुढारी

रोबोटिक्स अभियंत्यांची आरोग्य क्षेत्रात वाढणार डिमांड!

गणेश खळदकर

पुणे : इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी केवळ संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमाला प्राधान्य देतात. परंतु, अभियांत्रिकीमध्ये नवनवीन शाखांचा उदय होत असून, यातून विद्यार्थ्यांना करिअरची विविध कवाडे खुली होत आहेत. सध्या रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात रोबोटिक्स अभियंत्यांची आरोग्य क्षेत्रात डिमांड वाढणार आहे, अशी माहिती अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगांमध्ये मुळातच जेथे मनुष्याच्या जिवाला धोका संभवतो, तेथे मनुष्याऐवजी रोबोटचा वापर आता अनेक क्षेत्रांत वाढला आहे. रोबोट आता उद्योगांबरोबरच रोजच्या जीवनाचाही अविभाज्य अंग होत आहे. येत्या काळात आरोग्य व्यवस्थेत रोबोटचा वापर प्रचंड वाढणार आहे. रोबोटचा उपयोग औद्योगिक कंपन्या, लष्करी, कृषी, हॉटेल, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांतील विविध कामांमध्ये होत आहे. यात प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रात फक्त शस्त्रक्रिये पुरताच मर्यादित विचार न करता, दवाखान्यातील दैनंदिन कामे करतानासुद्धा यंत्रमानव मदत करू शकतो. येत्या काळात आरोग्य व्यवस्थेत रोबोटचा वापर प्रचंड वाढणार आहे.

2025 पर्यंत वैद्यकीय रोबोटवर आधारित अर्थव्यवस्था 12.7 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी अपेक्षित आहे. आरोग्य क्षेत्रात रोबोटच्या वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे ते न थकता अधिक काळासाठी आणि अचूक रुग्णसेवा करू शकते. तंत्रज्ञानाचा वाढता वेग पाहता रोबोट, इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्स वापरून निष्णात डॉक्टर्स दुर्गम भागांतील कुठल्याही रुग्णापर्यंत पोहोचू शकतात. रोबोटचा वापर प्रामुख्याने अचूक शस्त्रक्रिया, रुग्ण पुनर्वसन, स्वयंचलित रोग निदान आणि रुग्णसेवा यांसाठी होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

रोबोटिक्स अभियांत्रिकीच्या वापराने भारतासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती असलेल्या देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारता येईल. यामुळे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांना दूरस्थ तंत्रज्ञानाद्वारे कुठल्याही रुग्णाला सेवा देता येईल. तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांना एकाच वेळी अनेक रुग्णांवर उपचार करता येतील. येत्या काळात रोबोटिक्स अभियंत्यांना आरोग्य क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. – प्रा. डॉ. गणेश मा. काकांडीकर,

विश्वनाथ कराड एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेत रोबोटच्या वापराने छोटा आणि अगदी काही मिलिमीटर इतका अचूक काप घेता येतो, ज्यामुळे सॉफ्ट टिश्यू इन्व्हलपला इजा पोहोचत नाही आणि रक्तस्रावही कमी होतो. शस्त्रक्रियेची अचूकता आणि गुणवत्ता वाढली असून, रुग्ण लवकर बरे होऊन घरी जाऊ शकतात.

– डॉ. मंगेश दरेकर, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन

आरोग्य क्षेत्रातील कार्य

  • सर्जिकल असिस्टन्स रोबोट : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कॅमेर्‍याच्या साहाय्याने कमी गुंतागुंतीच्या /हाडांच्या शस्त्रक्रिया सुलभ
    करणारे रोबोट
  • मॉड्युलर रोबोट : रुग्ण पुनर्वसनात मदत करणारे रोबोट
  • सेवा रोबोट : दैनंदिन कामात मदत करून रुग्णालयातील कर्मचार्‍यांची कार्य क्षमता वाढविणे
  • सामाजिक रोबोट : रुग्ण आणि नातेवाइकांशी संवाद साधने
  • मोबाईल रोबोट : पूर्वनियोजित मार्गिकेने फिरून रुग्णालयातील
    कामे करणे
  • स्वयंचलित रोबोट : रिमोट कंट्रोल वापरून दूरस्थ नियंत्रणाद्वारे डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी मदत करणारे रोबोट

काही प्रमुख शस्त्रक्रिया

  • कर्करोगाच्या गाठींची शस्त्रक्रिया
  • कोरोनरी अरटेरी बायपास
  • सिस्टेक्टॉमी
  • पायलोरोप्लास्टी
  • हर्नियाची शस्त्रक्रिया
  • नितंबाची शस्त्रक्रिया
  • मूत्राशयाची शस्त्रक्रिया
  • मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया

वापराचे फायदे

  • धोकादायक परिस्थितीत मानवी चुका टाळणे
  • शस्त्रक्रियांचा कालावधी कमी करणे
  • रुग्णांचा बरे होण्याचा कालावधी कमी करणे
  • शस्त्रक्रियांच्या यशस्वितेचा दर वाढविणे
  • निष्णात डॉक्टरांची उपयोगिता वाढविणे
  • रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका कमी

हेही वाचा

 

Back to top button