पर्यटक उन्हात; प्रशासन कोमात! शनिवारवाडा प्रवेशद्वारावर तिकीटासाठी दमछाक

पर्यटक उन्हात; प्रशासन कोमात! शनिवारवाडा प्रवेशद्वारावर तिकीटासाठी दमछाक

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : पुरातत्त्व विभागाने रोखीचा व्यवहार व डिजिटल व्यवहारांद्वारे तिकीट विक्री सुरू ठेवण्याऐवजी फक्त डिजिटल तिकीट विक्री सुरू ठेवल्याने एकाच वेळी हजारो पर्यटक भरउन्हात प्रवेशद्वारावरच खोळंबून मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी माहिती घेताना एकच झुंबड उडाल्याचे चित्र शनिवारवाडा प्रवेशद्वारावर रविवारी (दि.26) पाहावयास मिळाले. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागला. भरउन्हात लहान मुले, वयस्कर नागरिकांचे हाल होत असून प्रवेशद्वारावरच धक्काबुक्की होत आहे. यामुळे 'पर्यटक उन्हात अन् प्रशासन कोमात' अशी परिस्थिती नेहमी पाहावयास मिळते.

ऑनलाइन प्रणालीची प्रक्रिया खूपच किचकट असून वेळखाऊ आहे. यामध्ये देशाचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, आयपी नंबर प्रफू, एकूण पर्यटक संख्या, नाव, वय, लिंग, मेल आयडी यासारखे अनेक मुद्दे फॉर्ममध्ये भरल्यानंतर सर्व्हे चालू असतील तर प्रक्रिया पूर्ण होऊन शनिवारवाड्यात प्रवेश मिळत आहे. सध्या उन्हाळी सुटीचा काळ असल्याने अनेक देशी- विदेशी पर्यटक शहरातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पुण्यात येत आहेत. मात्र, ऑनलाइन तिकीट काढण्याच्या गैरसोयीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून पुरातत्त्व विभागाकडून शनिवारवाड्यात येणार्‍या पर्यटकांसाठी रोखऐवजी ऑनलाइन तिकीट काढून प्रवेश देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पुरातत्त्व विभागाने रोखीचा व्यवहार व डिजिटल व्यवहारांद्वारे तिकीट विक्री सुरू ठेवण्याऐवजी फक्त डिजिटल तिकीट विक्री सुरू ठेवल्याने शनिवारवाडा भेटीला येणार्‍या पर्यटकांची मागील एक महिन्यापासून गैरसोय होत आहे. त्यामुळे शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर नेहमी पर्यटकांची झुंबड पाहावयास मिळत आहे.

सध्या सगळीकडेच ऑनलाइन व्यवहार सुरू आहेत, जेणेकरून पारदर्शकता येईल. शासनाची ती पॉलिसी आहे. गर्दी जास्त असली तर आम्ही ऑफलाइन तिकीट विक्री सुरू करतो. शनिवारवाडा परिसरात लवकरच 10-15 जागांवर बार कोडविषयी माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. तसेच, आठ ते दहा ठिकाणी नवीन बार कोड लावणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या सध्या तेरा स्टेप्स आहेत, त्या कमी करून फक्त चार स्टेप ठेवणार आहे. तसेच, गेटवरील कर्मचार्‍यांच्या संख्येत दोनवरून वाढ करून लवकरच 7-8 कर्मचारी मार्गदर्शनासाठी नेमणार आहे.

– गजानन मंडावरे, संरक्षण साहाय्यक, पुरातत्व विभाग.

कडक उन्हाळा असल्याने प्रवेशद्वाराशिवाय इतरत्र कुठेही सावलीत थांबायला जागाच नाही. आमच्याबरोबर लहान मुले, वयस्कर माणसे आहेत. आम्ही अर्धा तास झाला, प्रवेशद्वारावर थांबलोय. आम्ही ऑनलाइन फॉर्म भरतोय. मात्र, पेमेंट होत नाही. येथे पाण्याचीसुद्धा साधी व्यवस्था नाही.

– अनुप कुलकर्णी, पर्यटक, महाड, जि. रायगड

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news