किरकोळ कारणावरून आंदेशे येथे तरूणाचा खून; आंब्याच्या पेट्या रस्त्यात ठेवल्याने वाद

किरकोळ कारणावरून आंदेशे येथे तरूणाचा खून; आंब्याच्या पेट्या रस्त्यात ठेवल्याने वाद

पौड : पुढारी वृत्तसेवा : आंब्याच्या पेट्या रस्त्यात का ठेवल्या म्हणून जाब विचारल्यानंतर भांडणं झाले. मात्र त्या भांडणाचं रूपांतर हाणामारीत होऊन एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना आंदेशे (ता. मुळशी) येथील गाडे फार्म हाऊसजवळ घडली. यामध्ये शंकर संतोष उर्फ गफूर तोंडे (वय २२, रा. खेचरे, ता. मुळशी) या तरुणाचा बळी गेला आहे.

पौड पोलिसांकडून तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १५) दुपारी आंदेशे येथील गाडे फार्महाऊसजवळील पायवाटेवर आंब्याची कॅरेट ठेवलेली होती. त्याच पायवाटेने दत्तू वाटाणे आणि त्याचे साथीदार चालले होते. त्यावेळी दत्तू वाटाणे याने आंब्याची कॅरेट रस्त्यावर का ठेवली असा जाब विचारला. त्यावरून वाटाणे आणि तोंडे यांच्यात शाब्दीक वादविवाद झाला. स्थानिक नागरिकांनी तो वाद मिटवला होता. परंतु संध्याकाळी यावरून पुन्हा वाद झाला.

ग्रामस्थ अनभिज्ञ…

या वादाचे रूपांतर रात्री उशिरा भांडणात झाले. निर्जन ठिकाणी झालेल्या हाणामारीत शंकर तोंडे याच्यावर वार झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एक-दोन वेळा वाद स्थानिकांनी मिटवला होता; मात्र रात्री उशिरा झालेली हाणामारीचा व खुनाचा प्रकार ग्रामस्थांना माहीत नव्हता. गावापासून दूर निर्जन ठिकाणी प्रकार झाल्याने ग्रामस्थांना त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी उशिरा हा प्रकार उघडकीस आला.

शंकर तोंडे याचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला असून डोक्यावर दगडाने अथवा कोणत्यातरी धारदार हत्यारांनी मोठी जखम करून ठार मारण्यात आल्याचे पौड पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी दत्तू दिलीप वाटाणे (रा. आंदेशे, ता. मुळशी) व त्याचे इतर साथीदार फरार आहेत. त्यातील दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी व इतर साथीदारांचा शोध चालू असल्याचे पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव करत आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत असून मयत शंकर तोंडे याच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news