कोल्हापूर : आ. पी. एन. पाटील यांचे स्मारक उभारणार | पुढारी

कोल्हापूर : आ. पी. एन. पाटील यांचे स्मारक उभारणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे आणि विचारांशी एकनिष्ठता कशी असावी, याचा आदर्श राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना घालून देणारे आ. पी. एन. पाटील यांचे जिल्ह्यात स्मारक उभारण्याचा निर्धार रविवारी झालेल्या शोकसभेत करण्यात आला.

आ. पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित शोकसभेस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शब्दाला जागणारा नेता म्हणून पी. एन. पाटील यांची ओळख कायम राहील, असे भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले. ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी कार्यकर्त्यांना जपणार्‍या आ. पाटील यांच्या निधनाने करवीर तालुक्यात फार मोठी पोकळी निर्माण झाल्याचे साांगितले. भाजपचे महेश जाधव म्हणाले, पक्षनिष्ठा आणि स्वाभिमान यांचा आदर्श पाटील यांच्याकडून घेण्यासारखा आहे. एक उदार मनाचा नेता आपल्यातून निघून गेला.

कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पाटील यांनी केले. माझ्या पाठीमागे जे वलय आहे, त्याचे संपूर्ण श्रेय पी. एन. यांनाच असल्याचे माजी आ. संजय घाटगे यांनी सांगितले. माजी आ. के. पी. पाटील यांनी राज्यात निष्ठावंतांची यादी तयार करावयाची झाल्यास आ. पाटील यांचे नाव सर्वात पुढे असेल, असे सांगितले. आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पी. एन. पाटील यांचे स्मारक उभा करावे, अशी सूचना केली.

काँग्रेसच्या विभाजनानंतर पी. एन. पाटील यांनी दुभंगलेल्या काँगे्रसची सूत्रे हाती घेतली आणि जिल्ह्यात काँग्रेसची भक्कम बांधणी केली, असे आ. प्रकाश आवाडे म्हणाले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी पी. एन. पाटील यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा, अशी सूचना केली.

आ. पाटील यांचे जिल्ह्यात उचित स्मारक बांधण्यात येईल, असे सांगून आ. सतेज पाटील म्हणाले, राज्यातील एकनिष्ठ नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पी. एन. पाटील यांच्याकडे पाहिले जायचे. ते आमचा आधार होते. परंतु, त्यांना आमच्यापासून हिरावून नेले. नेतृत्वाला जपण्याचे काम त्यांनी केले. आ. विनय कोरे यांनी दिलदार, उमदे नेतृत्व आपल्यातून निघून गेले, असे सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रांत आमचे मतभेद झाले. परंतु, कधीही दुरावा आला नाही. तत्त्वांशी तडजोड केली नाही. ते राजासारखे जगले. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती. अनेक वेळा अन्याय झाला. मंत्रिपद मिळाले नाही. परंतु, कधी त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. गांधी घराण्यावर प्रचंड निष्ठा होती. अशा नेत्याचे स्मारक करावयाचे असेल, त्यांच्या नावाने पुरस्कार द्यावयाचा असेल, तर त्याला आपले संपूर्ण सहकार्य करू. भोगावती साखर कारखान्यालाही सहकार्य करू.

शाहू महाराज यांनी पी. एन. पाटील काँग्रेसशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले. स्वत:च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपला प्रचार केल्याचे सांगितले.

यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. राजुबाबा आवळे, आ. जयंत आसगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी आ. राजीव आवळे, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, मनसेचे प्रसाद पाटील, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे दगडू भास्कर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले.

Back to top button