पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांची लूट; मोटार वाहन कायद्याची ‘ऐशीतैशी’ | पुढारी

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांची लूट; मोटार वाहन कायद्याची ‘ऐशीतैशी’

कोरेगाव पार्क : पुढारी वृत्तसेवा : पुणे स्टेशन परिसरात असलेल्या महापालिकेच्या तुकाराम शेठ शिंदे वाहनतळ सध्या खासगी वाहनांच्या विळख्यात अडकले आहे. आरटीओ आणि संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षाने या ठिकाणी खासगी वाहनांतून प्रवाशांची अनधिकृत वाहतूक होत आहे. या वाहनचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या वाहनतळाच्या पार्किंगच्या जागेत पीएमपी बसस्थानक असून, या ठिकाणी प्रवाशांची नेहमी गर्दी असते. मात्र, या ठिकाणी खासगी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली होत आहे. पुणे-मुंबईदरम्यान खासगी वाहतूक करणार्‍या एजंटांकडून पीएमपी आणि एसटी बसचालकांना अरेरावी केली जात आहे. पीएमपी आणि एसटी बसना स्थानकात प्रवेश करताना खासगी वाहनचालकांच्या वाहनांचा मोठा अडथळा होत आहे. प्रवासी एसटीने जाण्यासाठी स्थानकात प्रवेश करताच एजंटांचा त्यांना गराडा पडत असून, खासगी वाहनांतून प्रवास करण्यास त्यांना भाग पाडले जात आहे.

पांढरी नंबर प्लेट असणार्‍या खासगी वाहनांतून प्रवाशांची सर्रासपणे पुणे-मुंबईदरम्यान वाहतूक केली जात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार प्रवास वाहतूक करण्यासाठी वाहनाला पिवळ्या क्रमांकाची नंबर प्लेट आवश्यक असते, म्हणजेच ते वाहन प्रवासी वाहतूक करणाच्या नियमात बसणारे असते. मात्र, खासगी पांढरी नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांकडून मोटार वाहन कायद्याला केराची टोपली दाखवली जात आहे. याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

आरटीओ प्रशासनाने लक्ष द्यावे

तुकाराम शेठ शिंदे वाहनतळाच्या परिसरात अवैधपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे. वाहनचालकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्याचे प्रकार अनेकदा समारे आले आहेत. त्यामुळे आरटीओ अधिकार्‍यांनी अपघाताच्या अनुचित दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

शिंदे वाहनतळाच्या परिसरात खासगी वाहनांचा त्रास पीएमपी बसचालक व वाहकांना सहन करावा लागत आहे. खासगी वाहतुकीस अटकाव केल्यास ते आमच्या सोबत वाद घालतात. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्यापही कारवाई झाली नाही.

– संजय कुसाळकर, डेपो मॅनेजर, पुणे स्टेशन पीएमपी.

हेही वाचा

Back to top button