जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : खंडेरायाच्या जेजुरीनगरीत भरवस्तीमधील एका घरावर पेरामोटरिंग कोसळले. यामध्ये चालकासह एक युवती जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. आस्था प्रदीप माने (वय 17, रा. पुणे) असे जखमी झालेल्या युवतीचे नाव असून, तिच्यावर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पॅरामोटरिंगचा चालक चंद्रकांत महाडिक याला किरकोळ मार लागला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जेजुरी-कडेपठार रस्त्यावर फ्लाईंग रिनो पॅरामोटरिंग सेंटर गेल्या वर्षभरापासून पॅरामोटरिंग हा व्यवसाय सुरू आहे. जेजुरी शहर व खंडोबा गड डोंगर परिसर आदी एका फेरीसाठी प्रत्येकी 1 हजार 500 ते 2 हजार रुपये आकारले जातात. देवदर्शनासाठी येणारे अनेक भाविक या सुविधेचा लाभ घेतात. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या व्यवसायाबाबत व सुरक्षिततेच्या कारणावरून नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उड्डाण स्थळावरून नजीकच ऐतिहासिक होळकर तलाव, मल्हार गौतमेश्वर मंदिर, चिंचेची बाग आणि शहरातील मध्यवस्तीचे व गर्दीचे ठिकाण आहेत.
रविवारी (दि. 12) खंडेरायाचा देवदर्शनाचा वार असल्याने शहरामध्ये विशेषतः चिंचेची बाग व परिसरात भाविकांची लक्षणीय गर्दी होती. पुणे येथून देवदर्शनासाठी आलेल्या माने परिवारातील आस्था प्रदीप माने यांना घेऊन चालक चंद्रकांत महाडिक यांनी सायंकाळी 5 च्या सुमारास पेरामोटरिंगने उड्डाण केले. शहराच्या मध्यवस्तीतून जाताना पॅराशूटचा नट-बोल्टमुळे पंखा तुटला आणि त्यामध्ये छत्रीची दोरी अडकली. परिणामी, ते भरवस्तीमध्ये असलेल्या सतीश गुलाबराव गोडसे यांच्या घरावर कोसळले. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांनी धाव घेत चालक व भाविक युवतीला सुरक्षितपणे बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. याबाबत जेजुरी पोलिसांकडून संबंधितांचे जाब जबाब घेण्याचे काम सुरू आहे.
रविवार हा खंडेरायाचा दर्शनाचा वार असल्याने होळकर तलाव, चिंचेची बाग, मल्हार गौतमेश्वर मंदिर व मुख्य महाद्वार रस्त्यावर भाविकांची लक्षणीय गर्दी होती. या स्थळांपासून केवळ 50 मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. एका घराचे नुकसान आणि दोन जण जखमी झाले. मात्र, हीच घटना गर्दीच्या ठिकाणी किंवा ऐतिहासिक स्थळावर घडली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र, मोठा अनर्थ टळला, असे नागरिकांचे मत आहे. भविष्यात ऐतिहासिक स्थळे व वास्तू आदी ठिकाणी अशी उड्डाणे करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.
हेही वाचा