राजुरीत कोल्ह्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; गायीसह शेळीला घेतला चावा | पुढारी

राजुरीत कोल्ह्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; गायीसह शेळीला घेतला चावा

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : राजुरी (ता. जुन्नर) मध्ये कोल्ह्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी झाले. तर याच कोल्ह्याने शेळीसह गायी आणि कालवडीवरही हल्ला केला. ही घटना रविवारी (दि.12) सकाळी 8च्या सुमारास घडली. जखमी शेतकर्‍याला प्रथम राजुरीतील खासगी दवाखान्यात व त्यानंतर पुढील उपचारासाठी नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजुरी येथील डोबीडुंबरपट्टा शिवारातील शिवाजी दगडू डुंबरे (वय 62) हे घरासमोर शेतात काम करत होते. त्या वेळी अचानक आलेल्या कोल्ह्याने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला.

त्यांनी आरडाओरडा केल्याने कोल्ह्याने तिथून पळ काढत त्यांच्या घरासमोरील शेळीवर हल्ला केला. त्या वेळी डुंबरे कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर कोल्ह्याने तिथून पळत काढत शेजारील त्यांचे बंधू प्रभाकर दगडू डुंबरे यांच्या गोठ्यातील एका गाईला व एका कालवडीचा चावा घेतला. गायीचा आवाज ऐकून प्रभाकर यांनी आरडाओरडा केल्याने कोल्ह्याने शेतात धूम ठोकली. दरम्यान, शिवाजी डोंगरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनरक्षक त्रिंबक जगताप यांनी दिली.

कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

मागील काही महिन्यांपूर्वी या परिसरातील बांगरवाडी (ता.जुन्नर) येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कोल्ह्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button