मंत्रीपद वाटपावरून एनडीएमध्ये मतभेद, शपथविधी एक दिवस पुढे ढकलला

मंत्रीपद वाटपावरून एनडीएमध्ये मतभेद, शपथविधी एक दिवस पुढे ढकलला
[author title="प्रशांत वाघाये" image="http://"][/author]
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नरेंद्र मोदी रविवारी ९ जून रोजी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एनडीएतील घटक पक्षांनी मंत्रीपदांबाबत टाकलेल्या अटी मान्य करून अखेर सरकारचे सूत्र ठरविण्यात आले. काही मुद्यांवर एकमत झाले नसल्याने आधी शनिवारी ठरविलेली शपथविधीची तारीख बदलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, शपथविधीची तारीख बदलविण्यामागे मंत्रिपदावरून असलेले मतभेद नसून ८ जूनला शुभ मुहूर्त नसल्यामुळे ९ जून ही तारीख ठरविण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. मंत्रालय वाटपाबाबत जोवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शपथविधीची तारीख जाहीर करू नये, असे तेलुगू देसम पक्षाने भाजपला सांगितल्याचे समजते. त्यामुळे शपथविधी ९ जून रोजी होण्याची शक्यता तेलुगू देसम पक्षाने व्यक्त केली आहे.

मंत्रालय वाटपाचे घोडे कुठे अडले? 

तेलुगू देसम पक्षाने लोकसभा अध्यक्षपदासह ५ ते ६ मंत्रालयांची मागणी केली आहे. याशिवाय केंद्रीय गृहमंत्रीपद अमित शाह यांना देण्यास असहमती दर्शवली आहे. चंद्राबाबू नायडू यांना गेल्यावर्षी अटक झाली होती. या अटकेमुळे अमित शाह यांच्याबद्दल त्यांची नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तेलुगू देसम पक्ष लोकसभा अध्यक्षपदासह तीन मंत्रिपदांवर तडजोड करण्यास तयार आहे. मात्र,  संयुक्त जनता दलाकडून ४ मंत्रालयांची मागणी केली जात आहे. त्यामध्ये रेल्वे, अर्थ आणि कृषी मंत्रालयाचा समावेश आहे. तीन खासदारांच्या मागे एक मंत्रालय हे सूत्र निश्चित करण्याची संयुक्त जनता दलाची मागणी आहे. मित्रपक्षांचा दबाव पाहता, भाजपमध्ये अजुनही विचार मंथन सुरूच आहे.

एनडीए सरकारच्या मंत्रीमंडळाचे सूत्र ठरले?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वतःकडे महत्त्वाची ४ खाती ठेवणार आहे. प्रत्येक ५ खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असे मंत्रिपदाचे सूत्र असणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहेत. त्यापाठोपाठ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला २ मंत्रीपदे मिळणार आहेत.
चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष, अनुप्रिया पटेल यांचा अपना दल पक्ष, पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चाला प्रत्येकी १ कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ सक्रीय

एनडीएच्या सहकाऱ्यांचा दबाव लक्षात घेता, मंत्रीमंडळाच्या जबाबदारीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रीय झाला आहे. यामुळे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी संघातील नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. यामध्ये जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, सरचिटणीस बी. एल. संतोष आणि संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सहकाऱ्यांचे मन जपण्याचे सूत्र तयार करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांना गृहमंत्री पदावरुन हटवले जाऊ शकते. याबाबत नड्डा यांच्या घरी अशा बैठका होण्याची शक्यता आहे. तर उद्या एनडीएच्या सर्व प्रमुख नेत्यांसह खासदारांचीही बैठक होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news