पंचगंगा कोरडी; नदीत मृत माशांचा खच | पुढारी

पंचगंगा कोरडी; नदीत मृत माशांचा खच

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पंचगंगा नदी अक्षरशः कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीत असणारे मोठमोठे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. जवळपास अर्धा किलो ते एक किलोपर्यंतचे मोठे नदीतील मासे मृत झाल्यामुळे पंचगंगा नदी घाट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीत पाणी नसल्यामुळे नदीतील कचरा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लवकरात लवकर धरणातून पाण्याचा विसर्ग केला नाही, तर परिस्थिती आणखीन गंभीर होणार आहे.

इचलकरंजीतील पंचगंगा नदी शहरास दररोज 9 एमएलडी पाणीपुरवठा करते. परंतु, पाणी उपसा करण्यासाठी वर्षभर अनेक विघ्न येतात. वारंवार येणार्‍या अडचणींमुळे शहरास नियमित पाणीपुरवठा होतच नाही. अनेकवेळा काळे पाणी, जलपर्णी अशा विविध कारणांमुळे शहरातील नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ येते. सध्याची परिस्थिती पाहिली, तर नदीत अनेक मृत माशांचा खच, जलपर्णी आणि काळेकुट्ट पाणी पाहावयास मिळते. शेकडो मासे मृत्युमुखी पडल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मृत झालेल्या माशांना खाण्यासाठी अनेक भटकी कुत्री पंचगंगा नदी घाट परिसरात जमत आहेत. दिवसभर या भटक्या कुत्र्यांचा वावर आहे.

अनेकांनी मृत झालेले मासे घाटावर काढून ठेवले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, पंचगंगा नदी घाट परिसरात चालत फिरण्यासाठी येणार्‍या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घाट, नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवा

जवळपास दोन ते तीन दिवसांपासून मृत माशांचा खच पडला आहे. तसेच पंचगंगा नदी कोरडी पडली आहे. या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच घाट व परिसर अस्वच्छ आहे. घाटावर मोठमोठे कचर्‍याचे ढीग लागले आहेत. घाटावर फिरायलासुद्धा नागरिक येत नाहीत, एवढी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Back to top button