मतदान यंत्र पूजा प्रकरण : रूपाली चाकणकरांनी भावनेच्या भरात चूक केली; सुनील तटकरे | पुढारी

मतदान यंत्र पूजा प्रकरण : रूपाली चाकणकरांनी भावनेच्या भरात चूक केली; सुनील तटकरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभेत खडकवासला मतदारसंघातील धायरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मतदान यंत्राची पूजा करून भावनेच्या भरात चूक केली. त्यावर आता कायद्यानुसार कार्यवाही होईल, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा यापूर्वी तीन वेळा निर्णय झाला होता, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. या वेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख, संजय मयेकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर रूपाली चाकणकर यांनी मतपेटीची पूजा केली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पैशांचे वाटप झाले, आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवीगाळ केल्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तटकरे म्हणाले, कधी कधी भावनेच्या भरात चूक होत असते. चाकणकर यांच्या हातून चूक झाली. नियमानुसार काय ती पुढील कारवाई होईल. पैसे वाटप करण्याचा आरोप, तक्रारी करणे म्हणजे त्यांना पराभव दिसू लागला आहे.
तटकरे म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने संविधान, लोकशाही धोक्यात आणली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

हेही वाचा

Back to top button