कांदा भावात वाढ; आळेफाटा येथे उच्चांकी आवक : निर्यात खुली झाल्याचा परिणाम | पुढारी

कांदा भावात वाढ; आळेफाटा येथे उच्चांकी आवक : निर्यात खुली झाल्याचा परिणाम

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : पावणेपाच महिन्यांनंतर कांदा निर्यात खुली केल्यावर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (दि. 7) झालेल्या लिलावात कांदा भाव वधारले. मात्र यामुळे येथे 32 हजार 800 गोणी अशी उच्चांकी आवक झाली, अशी माहिती सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे यांनी दिली. आळेफाटा उपबाजारात झालेल्या लिलावात प्रति 10 किलोस 221 रुपये असा कमाल दर मिळाला. केंद्र सरकारने शनिवारी (दि. 4) रोजी कांदा निर्यात काही अटींवर खुली केली. यामुळे सर्व बाजार समितींमधील कांदा लिलावात दर काही प्रमाणात वधारले आहेत.

पावणेपाच महिन्यांपूर्वी कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांदा दरात मोठी घसरण झाली. हीच परिस्थिती आळेफाटा उपबाजारात कांदा लिलावात होती. त्यावेळेस लाल सेंद्रिय कांदा व नंतर रांगडा लाल कांदा विक्रीस येत होता. घसरलेल्या दरामुळे अनेक शेतकरीवर्गांची आर्थिक गणिते कोलमडली. दरम्यान उन्हाळी गावरान कांद्याची काढणी पूर्ण झाली, मात्र भाव नसल्याने शेतकरी वर्गाने या टिकाऊ कांद्याची साठवण केली. यामुळे आळेफाटा उपबाजारातील आवक ही रोडावलेलीच होती. शनिवारी कांदा निर्यात खुली झाली व दर वधारले यामुळे शेतकरी कांदा विक्रीस आणू लागल्याने आळेफाटा उपबाजारात हंगामातील उच्चांकी अशी आवक झाली. शेतकरी वर्गाने 32 हजार 800 गोणी कांदा विक्रीस आणल्याची माहिती सचिव रुपेश कवडे, कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली. या आवकेमुळे कांदा लिलावगृहाबाहेर विक्रीस ठेवण्यात आला होता.

कांद्यास प्रति 10 किलोस मिळालेले भाव पुढीलप्रमाणे

  • एक्स्ट्रा गोळा : 200 ते 221 रुपये.
  • सुपर गोळा : 180 ते 200 रुपये.
  • सुपर मीडियम :160 ते 180 रुपये.
  • गोल्टी व गोल्टा : 120 ते 150 रुपये.
  • बदला व चिंगळी : 50 ते 120 रुपये.

हेही वाचा

Back to top button