मुले पळविल्याच्या अफवेने खळबळ : शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील प्रकार | पुढारी

मुले पळविल्याच्या अफवेने खळबळ : शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील प्रकार

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्रापूर येथे एका भंगार व भांडी व्यावसायिकाने दौंड तालुक्यातील पाटेठाण परिसरातून दोन मुलांना पळवून आणल्याची अफवा बुधवारी (दि. 8) दुपारच्या सुमारास पसरली आणि शिक्रापूरसह यवत पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, गैरसमजातून घडलेल्या या प्रकारात नागरिकांनी भंगार व्यावसायिकाची गाडी फोडून त्याला बेदम मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने या घटनेला आवर घालण्यात यश आले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पाटेठाण येथील दोन लहान मुलांना एका भंगार व्यावसायिकाने अपहरण करून आणल्याची अफवा पसरली आणि शिक्रापूर पोलिसांची धावपळ सुरू झाली.

दरम्यान, शिक्रापूर-तळेगाव रस्त्यालगत नागरिकांनी अपहरण करणार्‍या संशयिताला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात करीत त्याची गाडी देखील फोडून त्याला तळेगाव ग्रामपंचायतीसमोर नेले. 100 पेक्षा अधिक लोकांचा जमाव तळेगाव ढमढेरे येथे गोळा झाल्याने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस हवालदार किशोर तेलंग, विकास पाटील, पोलिस नाईक अमोल नलगे, रोहिदास पारखे, प्रफुल्ल सुतार, नारायण सानप, अंकुश चौधरी, तळेगाव ढमढेरेचे पोलिस पाटील पांडुरंग नरके पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावाला आवर घातला. दरम्यान, यवतचे पोलिस हवालदार अजय दौंडकर देखील घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या वेळी चौकशी केली असता संबंधित भांडी व भंगार व्यावसायिकाने पाटेठाण येथून महिलेकडून काही भंगार घेतले. त्याच्याकडे पूर्ण पैसे नसल्याने त्याने मी मुलांकडे पैसे देतो, माझ्यासोबत पाठवता का? असे म्हटल्याने त्या महिलांनी मुलांना पाठविले होते. याचवेळी पाटेठाणमध्ये मुले पळवून नेल्याबाबतचा संदेश पसरला अन् खळबळ उडाली. पाटेठाण येथून आलेल्या युवकांनी शिक्रापूर येथे त्याला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केल्याने जमलेल्या नागरिकांनीसुद्धा त्याला बेदम मारहाण केली. अखेर सत्य परिस्थिती समोर आली आणि मुले पळविल्याची अफवा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीच्या वाहनाचे नुकसान व जमावाने केलेल्या मारहाणीबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button