शनिवारवाड्यावर सर्व्हर डाऊन; ऑनलाइन तिकीट विक्रीमुळे पर्यटकांची गैरसोय

शनिवारवाड्यावर सर्व्हर डाऊन; ऑनलाइन तिकीट विक्रीमुळे पर्यटकांची गैरसोय
Published on
Updated on

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : यंत्रणांमधील आधुनिकीकरण चांगले आहे. पण, नागरिकांना त्याचा उपयोग होण्याऐवजी मनस्तापच होत असल्याचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून शनिवारवाडा पाहण्यासाठी येणारे पर्यटक घेत आहेत. सर्व्हर डाऊनचे कारण देत या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना ऑनलाइन तिकीट घेण्यास सांगण्यात येते. मग, एकाच वेळी शेकडो पर्यटक प्रवेशद्वारावरच खोळंबून आपल्या मोबाईलमध्ये तिकीट शोधत राहतात.

सध्या उन्हाळी सुटीचा काळ असल्याने अनेक देशी-विदेशी पर्यटक शहरातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पुण्यात येत आहेत. मात्र, आनलाइन तिकीट काढण्याच्या गैरसोयीमुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून पुरातत्व विभागाकडून शनिवारवाड्यात येणार्‍या पर्यटकांसाठी रोखऐवजी ऑनलाइन तिकीट काढून प्रवेश देण्यात येत आहे. ऑनलाइन प्रणालीची प्रक्रिया खूप किचकट असून, वेळखाऊ आहे. यामध्ये जेंडर, देशाचे नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, आयपी नंबर प्रूफ, देशाचे नाव, एकूण पर्यटकसंख्या, नाव, वय, मेल आयडी यांसारखे मुद्दे फॉर्ममध्ये भरल्यानंतर सर्व्हर चालू असतील तर प्रक्रिया पूर्ण होऊन शनिवारवाड्यात प्रवेश मिळत आहे.

पुरातत्व विभागाने रोखीचा व्यवहार व डिजिटल व्यवहारांद्वारे तिकीट विक्री सुरू ठेवण्याऐवजी फक्त डिजिटल तिकीट सुरू ठेवल्याने शनिवारवाडा भेटीस येणार्‍या पर्यटकांची मागील एक महिन्यापासून गैरसोय झाल्याने शनिवारवाड्यावरील प्रवेशद्वारावर पर्यटकांची झुंबड पाहावयास मिळत आहे. तसेच भर उन्हात लहान मुले आणि वयस्कर नागरिकांचे हाल होत आहेत.

विनाकारण वेठीस कशाला धरता; पर्यटकांचा सवाल

अर्धा तास झाला आम्ही ऑनलाइन फॉर्म भरतोय; पण पेमेंट होत नाही. त्यापेक्षा सरळ स्कॅनर ठेवून जागेवर पेमेंट होऊ शकते. मात्र, ऑनलाइन फॉर्म भरा, ओटीपी घ्या, आधार नंबर द्या, हा वेगळाच प्रकार येथे पाहायला मिळाला. रोख आणि ऑनलाइन दोन्ही पर्याय सुरू ठेवा. विनाकारण नागरिकांना वेठीस धरले जात आहे. वेळ गेला. खूप मनस्ताप झाला. कडक उन्हाळा सुरू असल्याने कुठे सावलीत थांबलासुद्धा जागा नाही, अशी खंत चिंचवडवरून शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेले अमोल कुंभार यांनी सांगितले.

नेटवर्क जात-येत असल्याने पेमेंट करण्यास अडथळा

आम्हाला रांगेत उभे राहून एक तास झाला. अजून तिकिट मिळाले नाही, ही खंत शनिवारवाडा पाहण्यासाठी पवई (मुंबई) वरून आलेले पर्यटक मार्टिन मारिओ यांनी रविवारी (दि. 19) व्यक्त केली. अनेक पर्यटकांना यूपीए शोधायला तसेच कोणत्या पेमेंट मोड जीपे, फोनपे करणार, त्यांचा आयडी काय. नंतर कॉर्ड डिटेल्स टाका, सर्व झाल्यावर आपले सर्व्हर डाऊन आहे, हे कळते. शनिवारवाड्याबाहेर एकाच सर्व्हरवर पेमेंट केल्यामुळे नेटवर्क जाम झाल्याने पेमेंटदेखील नीट होत नाही.

मागील महिन्यापासून शनिवारवाड्यात रोख तिकीट विक्री बंद होऊन ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली. नागरिकांच्या माहितीसाठी शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारावर बारकोड फलक लावले असून, ऑनलाइन फार्मची माहिती भरण्यासाठी गेटवर कर्मचारी ठेवले आहेत.

– शनिवारवाडा प्रशासन

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news