विद्यापीठ पीएच.डी.साठी घेणार पेट परीक्षा! ‘या’ तारखेनंतर होणार वेळापत्रक जाहीर | पुढारी

विद्यापीठ पीएच.डी.साठी घेणार पेट परीक्षा! 'या' तारखेनंतर होणार वेळापत्रक जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. त्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करण्यात आली असून, येत्या 13 मे रोजी लोकसभेचे मतदान झाल्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्‍यांनी दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. प्रवेशासाठी नेट परीक्षेचे गुण ग्राह्य धारण्याबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. तसेच, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनासुध्दा पीएच.डी.साठी प्रवेश घेण्याबाबत काही नियमांच्या अधीन राहून मुभा दिली आहे.

त्यामुळे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर यूजीसीकडेसुद्धा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, यूजीसीकडून कोणतेही लेखी उत्तर मिळत नसल्याने अखेर विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू केल्या असून, 13 मेनंतर विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेश परीक्षा अर्थात पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यूजीसीच्या अधिकार्‍यांबरोबर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली.

तीत विद्यापीठांनी पेट परीक्षा घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत यूजीसीला स्पष्ट विचारण्यात आले. त्यावर विद्यापीठांना पेट परीक्षा घेता येईल, असे यूजीसीचे काही अधिकारी तोंडी सांगत आहेत. परंतु, लेखी स्वरूपात काहीही निर्देश देत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पुणे विद्यापीठासह राज्यातील इतरही विद्यापीठे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जून महिन्यात होणार्‍या नेट परीक्षेपूर्वी पेट परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया केव्हा घेतली जाणार, याच्या प्रतीक्षेत आहेत.

पीएच.डी. प्रवेशासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, तर काही विद्यापीठांनी अद्याप प्रक्रिया सुरू केलेली नाही. पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घ्यावी का? यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे यूजीसीच्या अध्यक्षांबरोबर बोलणे झाले आहे. नेट परीक्षा ही पारंपरिक विषयांसाठीच आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आदींसाठी नेट परीक्षाच नाही. संबंधित विषयांच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी पेट परीक्षा घेणे गरजेचे असल्याचे विद्यापीठाने यूजीसीला कळविले आहे. त्यामुळे 13 मेनंतर पेट परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेऊन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

Back to top button