पराभव दिसू लागल्याने भाजप धार्मिक अजेंड्यावर; प्रदेश काँग्रेसचा आरोप | पुढारी

पराभव दिसू लागल्याने भाजप धार्मिक अजेंड्यावर; प्रदेश काँग्रेसचा आरोप

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन्ही टप्प्यांतील मतदान विरोधात गेल्याची जाणीव झाल्याने भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता धार्मिक अजेंडा हाती घेतला आहे. ते पाकिस्तानलाही प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपची ही त्यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे प्रतिक आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

लोंढे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने रविवारी राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेत भाजपच्या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर लोंढे म्हणाले, भाजपची जाहिरात हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. भाजपला भारत व पाकिस्तान मधील फरक कळायला हवा. पंतप्रधान मोदी हतबल, निराश व वैफल्यग्रस्त झाले आहेत. दहा वर्षांत जनहिताची कामे न केल्याने मतांसाठी त्यांना पाकिस्तानचा आधार घ्यावा लागत आहे.

पाकिस्तानात जाऊन बिर्यानी खाणारा, आयएसआयला पठाणकोटमध्ये बोलावणारा पंतप्रधान पाहिजे की, चीनसमोर निधड्या छातीने उभा राहणारा, मणिपूरमध्ये जाऊन पीडितांची सांत्वन करणारा, कन्याकुमारी ते श्रीनगर अशी पायी भारत जोडो यात्रा काढणारा पंतप्रधान पाहिजे अशी जाहिरात आम्हीही देऊ शकतो. पण, आम्हाला अशी गोष्टींची आवश्यकता नाही असेही लोंढे म्हणाले.

भारतात जनतेने कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी इथलाच एक पक्ष विजयी होणार आहे. त्याच्याशी पाकचा संबंध काय आहे. भाजप व पंतप्रधान खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. हा आचारसंहितेचा भंग आणि गुन्हाही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपसोबतच ही जाहिरात देणारे त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस विधी विभागाचे अध्यक्ष रवी जाधव, गजानन देसाई यांचा समावेश होता.

Back to top button