LokSabha Elections | खास माणसांचा नाही, सामान्यांचा मी खासदार असेन : रवींद्र धंगेकर | पुढारी

LokSabha Elections | खास माणसांचा नाही, सामान्यांचा मी खासदार असेन : रवींद्र धंगेकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मी खासदार झाल्यास सामान्य माणसांचाच असेल आणि येथील प्रत्येकजण तेव्हा खासदार असेल. यासाठी लोकसभा निवडणुकीत पुणेकरांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले. प्रचारफेरीदरम्यान पत्रकारांशी बोलताना धंगेकर म्हणाले, सध्या मूठभर उद्योजकांचे लाड केले जात आहेत. सामान्य माणसाकडे लक्ष दिले जात नाही. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. मी निवडून आल्यास सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देईन.

मी याआधीही नगरसेवक असताना आणि आमदार झाल्यानंतरही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत धावून गेलो आहे. अनेकदा यंत्रणा आणि प्रशासन यांच्याकडून सामान्य माणसांची होरपळ होते. अशा प्रत्येक सामान्य माणसाच्या प्रश्नांची मी यापुढेही सोडवणूक करेन. शिक्षण, आरोग्य, रस्ते, तरुणांना रोजगार, उद्योग अशा विविध विषयांवर भरीव काम करेन. दिल्लीपर्यंत या पुण्याचा आवाज बुलंद करेन, असे धंगेकर यांनी सांगितले. ज्या महात्मा फुलेंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, तिथे मुलींच्या शिक्षणासाठी मी पुढाकार घेईन. गोरगरीब मुली शिकल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असे सांगून ते पुढे म्हणाले, माझा प्रत्येक क्षण पुण्याच्या विकासासाठी आणि पुणेकरांच्या हितासाठी असेल.

हेही वाचा

Back to top button