LokSabha Elections : ‘नारीशक्ती’ची वानवा; 138 पैकी अवघे 13 महिला उमेदवार | पुढारी

LokSabha Elections : ‘नारीशक्ती’ची वानवा; 138 पैकी अवघे 13 महिला उमेदवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘नारीशक्ती’ची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार मतदारसंघांमध्ये 138 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, महिला उमेदवारांची संख्या अवघी 13 आहे. त्यामध्ये बारामती मतदारसंघात सर्वाधिक आठ, पुण्यात तीन, तर शिरूर आणि मावळमध्ये प्रत्येकी एक महिला उमेदवाराचा समावेश आहे.

जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही मतदारसंघांमध्ये बारामतीवगळता इतर तिन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवारांचे प्रमाण अत्यल्प आहे. बारामतीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी महिला उमेदवार दिला आहे. निवडणूक प्रक्रियेत महिला उमेदवारांची संख्या कमी असल्याने राजकीय पक्षांची महिलांबाबतची असलेली उदासीनता स्पष्ट झाली आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार मतदारसंघांत मिळून एकूण 138 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये बारामतीमधून 38, शिरूरमधून 32, मावळमधून 33 आणि पुण्यातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

तीसपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने प्रत्येक मतदारसंघात तीन बॅलेट युनिट प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार आहेत. मात्र, 138 उमेदवारांमध्ये केवळ 13 महिला उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात महाआघाडीच्या सुप्रिया सुळे, महायुतीच्या सुनेत्रा पवार, बसपच्या प्रियदर्शनी कोकरे, बसपच्या (आंबेडकर) त्रिशला कांबळे, हिंदुस्थान जनता पार्टीच्या सविता कडाळे, अपक्षांमध्ये कल्याणी वाघमोडे, शुभांगी धायगुडे आणि सुनीता पवार यांचा समावेश आहे.

शिरूरमध्ये 32 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यांमध्ये अपक्ष छाया जगदाळे सोळंके या एकच महिला निवडणूक रिंगणात आहेत. मावळमध्ये 33 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी या एकच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात 35 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यांमध्ये राष्ट्रीय मराठा पार्टीच्या विजयालक्ष्मी सिंदगी, अपक्षांमध्ये अश्विनी खैरनार, डॉ. देवयानी पंडित अशा तीन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

जाहीरनाम्यात केंद्रस्थानी; उमेदवारीत मात्र हात आखडता

प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. परंतु, महिलांना संधी देण्यास पुणे जिल्ह्यात बारामतीवगळता इतर ठिकाणी राजकीय पक्षांनी हात आखडता घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा

Back to top button