रत्नागिरी : कशेडी बोगद्यातून हलक्या वाहनांना मुंबईकडे जाण्यास परवानगी | पुढारी

रत्नागिरी : कशेडी बोगद्यातून हलक्या वाहनांना मुंबईकडे जाण्यास परवानगी

खेड : अनुज जोशी कशेडी बोगद्याचा वापर आता मुंबईत जाण्यासाठी करता येणार असून कोकणवासीयांसाठी हि आनंदाची बातमी महाराष्ट्र दिनी देऊन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने अनोखी भेट दिली आहे. आज (बुधवार) एका बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले आहे.
कोकण मार्गे मुंबईत जाण्यासाठी लहान वाहनांना आता कशेडी घाटातील बिकट वाट पार करावी लागणार नाही. महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने आता लहान वाहनांना सध्या वाहतूक सुरू असलेल्या बोगद्यातून प्रवेशाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता कशेडीतील एका बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा जाणाऱ्या लहान वाहनांना कशेडी बोगद्यातून प्रवेश देण्यात येत होता. परंतु गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. सातत्याने प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन हलक्या वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु छोट्या वाहनांना बोगदा अथवा जोड रस्त्यावर थांबता येणार नाही. ताशी ४० किलो मिटर वेग मर्यादा पाळावी लागेल. एसटी बस, मालवाहू ट्रक, टँकर, डंपर यासह अवजड वाहनांना कोणत्याही परिस्थितीत बोगद्याचा वापर करता येणार नाही. अवजड वाहने कशेडी घाट मार्गच मुंबई – गोवा व गोवा – मुंबई मार्गक्रमण करतील.

Back to top button