तणावाचा होतो गर्भधारणेवर परिणाम; या वयोगटांतील जोडप्यांना गर्भधारणेसंबंधी समस्या | पुढारी

तणावाचा होतो गर्भधारणेवर परिणाम; या वयोगटांतील जोडप्यांना गर्भधारणेसंबंधी समस्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढीस लागला आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. वाढत्या ताणतणावामुळे गर्भधारणेतही अडचणी येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 40 या वयोगटांतील 80 टक्के जोडप्यांना तणावामुळे गर्भधारणेसंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विविध अभ्यासांनुसार तणावाच्या उच्च पातळीमुळे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही हार्मोनचे संतुलन बिघडते. त्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.

गर्भधारणेदरम्यानच्या तणावामुळे मुदतपूर्व जन्म, कमी वजनाचे बाळ आणि विकासासंबंधी समस्या उद्भवू शकतात. दीर्घकालीन ताणतणाव अनुभवणार्‍या मातांना गर्भधारणेसंबंधित मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखा धोका असू शकतो. तणावामुळे मासिकपाळीत व्यत्यय येतो. त्यामुळे जोडप्यांना गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागतो. तणावामुळे नातेसंबंधांवर परिणाम होऊन कुटुंबनियोजनाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तणावाचा सामना करणारी जोडपी निरोगी गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या पद्धतींचे पालन करण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे कुटुंबनियोजनाच्या प्रवासात तणावाची भूमिका ओळखून तो डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी करण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात.

कुटुंबनियोजन उपाय

  • कुटुंबनियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे.
  • दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यांसारख्या तंत्रांचा सराव करणे.
  • रात्री पुरेशी झोप घेणे, नियमित आरोग्य तपासणी करणे.
  • कौटुंबिक नियोजन आणि गर्भधारणेवर तणावाचा परिणाम होणार नाही याकडे लक्ष देणे.

जोडप्यांनी एकत्रितपणे मेडिटेशनसारख्या तंत्राचा सराव करून पालकत्व आणि गर्भधारणेच्या नियोजनाच्या प्रवासाला सुरुवात करावी. आपले आयुष्य तणावमुक्त कसे राहील, यासाठी प्रयत्न करावा. ध्यान आणि योगामुळे तणावाची पातळी कमी होते. जोडप्यांमधील संबंध आणखी घट्ट होतात. भावना, भीती आणि कौटुंबिक नियोजनाविषयीच्या अपेक्षांबद्दल खुला संवाद साधा. जोडप्यांनी त्यांच्या आणि येणार्‍या बाळाच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

– डॉ. भारती ढोरे पाटील, वंध्यत्व निवारणतज्ज्ञ

हेही वाचा

Back to top button