अजित पवार, सुनेत्रा पवार आणि मी हा ‘परिवारवाद’च! : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

अजित पवार, सुनेत्रा पवार आणि मी हा ‘परिवारवाद’च! : खा. सुप्रिया सुळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी ‘परिवारवाद’ आहोत. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आम्ही तिघेही सॉफ्ट लँडिंग आहोत, मी हे संसदेतदेखील बोलले आहे. आम्ही ‘परिवारवाद’ आहोत, हे नाकारून कसे चालेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुण्यामध्ये सोमवारी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘परिवारवादा’चा मुद्दा समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिवारवादा’चा हा देश तिरस्कार करतो, असे वक्तव्य करत विरोधकांवर निशाणा साधत आहेत, त्यावर सुप्रिया सुळे बोलत होत्या.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यासोबत 2019 मध्ये शरद पवार यांची बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान शरद पवार रागावून निघून गेले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्यावर सुळे म्हणाल्या, अशी कोणती बैठक झाली असेल, तर प्रत्येक बैठकीला मी उपस्थित नव्हते. मात्र, असे काही घडले आहे, याबाबत मला तरी आठवत नाही. भाजपकडून ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असा प्रचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत आहेत, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते पुण्यात येत आहेत, तर त्यांचे स्वागत आहे. अतिथी देवो भवः ही आपली परंपरा राहिली आहे.

हेही वाचा

Back to top button