FIFAची मोठी घोषणा! ब्राझिलमध्ये 2027 च्या महिला फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजन | पुढारी

FIFAची मोठी घोषणा! ब्राझिलमध्ये 2027 च्या महिला फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2027 मध्ये होणाऱ्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान देशाची निवड करण्यात आली आहे. फिफाने (FIFA) शुक्रवारी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सुरू असलेल्या 74 व्या बैठकीत याची घोषणा करत 2027 मध्ये होणाऱ्या 10 व्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ब्राझील असेल हे जाहीर केले.

ब्राझीलने यापूर्वी 1950 आणि 2014 मध्ये पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यामुळे महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असेल. शिवाय दक्षिण अमेरिकेत होणारी ही पहिलीच महिला विश्वचषक स्पर्धा ठाणार आहे.

खरेतर महिला विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी ब्राझील आणि संयुक्त युरोपीय (बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड) यांच्यात चुरस होती. कारण यापूर्वी मागच्या महिन्यातच अमेरिका आणि मेक्सिको यांनी या शर्यतीतून त्यांचा संयुक्त प्रस्ताव मागे घेतला होता. तर त्या आधी नोव्हेंबर 2023 मध्ये द. आफ्रिकेने आपला दावा मागे घेतला होता. त्यामुळे या यजमानपद मिळवण्याच्या यादीत ब्राझील आणि संयुक्त युरोपीय हे दोघेच शिल्लक राहिले. अखेर फिफाने थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आयोजित बैठकीत मतदान घेतले. ज्यात ब्राझीलच्या पारड्यात सर्वाधिक (119) मते पडली. युनायटेड युरोपियन 78 मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले.

ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष एडमंडो रॉड्रिग्ज म्हणाले, ‘आज आम्ही बँकॉकमध्ये एक ऐतिहासिक दिवस अनुभवत आहोत. जागतिक महिला फुटबॉलचा हा विजय आहे. मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की हा इतिहासातील सर्वोत्तम महिला विश्वचषक असेल. या स्पर्धेमुळे जागतिक गुंतवणुकीबरोबरच दक्षिण अमेरिकेतील महिला फुटबॉलच्या विकासात मोठी झेप घेता येईल.’

2027 च्या विश्वचषक स्पर्धेत 32 देशांचा समावेश असेल आणि दहा शहरांमध्ये खेळला जाईल. महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 1991 साली सुरू झाली. चीनने प्रथमच महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अमेरिकेचा संघ चॅम्पियन ठरला होता. नॉर्वेचा संघ उपविजेता राहिला होता. महिला फुटबॉल विश्वचषक आतापर्यंत 9 वेळा खेळला गेला आहे. ज्यामध्ये अमेरिकेचा संघ चार वेळा चॅम्पियन ठरला आहे. तर जर्मन संघाने महिला विश्वचषकाचे विजेतेपद दोनदा पटकावले आहे. जपान, नॉर्वे आणि स्पेन यांनीही प्रत्येकी एकदा महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या महिला फुटबॉल विश्वचषकाच्या ट्रॉफीसाठी इंग्लंड आणि स्पेन यांच्यात स्पर्धा होती. ज्यामध्ये स्पेनचा संघ विजयी झाला होता.

Back to top button