सावधान! उष्माघाताचा वाढतोय धोका; काय घ्यावी काळजी? | पुढारी

सावधान! उष्माघाताचा वाढतोय धोका; काय घ्यावी काळजी?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात सलग दुसर्‍या दिवशी तापमानाने एप्रिलमधील उच्चांक मोडत शिवाजीनगर भागात 41.8 अंशाची नोंद केली. हे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान ठरले. तर शहरातील वडगाव शेरी, मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क येथील तापमान 43 अंशांच्या वर गेले होते. रविवारी शिवाजीनगरचा पारा 41.3 अंशावर होता. तो हंगामातील उच्चांक होता. मात्र, दुर्‍याच दिवशी सोमवारी शिवाजीनगरचा पारा 41.8 अंशांवर गेल्याने हे तापमान यंदाच्या हंगामातील उच्चांकी ठरले.

यंदा दर वर्षीच्या तुलनेत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. यंदा कमाल आणि किमान तापमानामध्ये विक्रमी वाढ नोंदवली जात आहे. सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. दर वर्षी केवळ विदर्भ, मराठवाड्यामध्ये अनुभवली जाणारी रखरख यंदा संपूर्ण राज्यात पसरली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासाचे प्रमाणही वाढले आहे.

राज्यात 1 मार्चपासून आतापर्यंत उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक 20 रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल ठाणे (19), नाशिक (17), वर्धा (16), बुलडाणा (15), सातारा (14) रुग्णांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्येही दर वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महापालिका रुग्णालये, जिल्हा रुग्णालये अशा ठिकाणी उष्माघात निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

काय काळजी घ्यावी?

  • तहान लागली नसेल तरी दिवसभर सातत्याने पाणी पित राहावे.
  • पातळ, सुती, हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
  • बाहेर जाताना गॉगल, स्कार्फ, रुमाल, टोपीचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लिंबूपाणी, ताक, ओआरएस आदींचे सेवन करावे.
  • लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांची जास्त काळजी घ्यावी.
  • उन्हात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.

राज्यात 1 मार्चपासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 184 रुग्णांची नोंद झाली असून, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी उन्हाबाबत काळजी घ्यावी.

– डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य विभाग

हेही वाचा

Back to top button