पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडी; नियोजनामुळे सिंहगड घाटात वाहतूक सुरळीत | पुढारी

पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडी; नियोजनामुळे सिंहगड घाटात वाहतूक सुरळीत

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : वन विभागाने वाहतूक नियोजन केल्याने रविवारी ( दि.28) सुटीच्या दिवशी सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक दिवसभर सुरळीत सुरू होती. उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंहगडावर दुपारनंतर पर्यटकांची संख्या रोडावली होती. पानशेत, सिंहगडकडून पुण्याकडे माघारी जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्याने पुणे -पानशेत रस्त्यावरील वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून कोलमडली होती. खडकवासला धरण चौपाटीसह खडकवासला, किरकटवाडी फाट्यावर वाहतूक कोंडी झाली. खडकवासला धरण तीरावरील डीआयटीपासून खडकवासला, किरकटवाडीपर्यंत वाहतूक मंदगतीने सुरू होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रविवारी सकाळी ढगाळ हवामान होते. दुपारी बारा वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने रस्त्यावर जेमतेम वाहतूक सुरू होती.
सायंकाळनंतर वाहतूक वाढली. पानशेत, वरसगाव धरण परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली. सिंहगडावर रविवारी दिवसभरात पर्यटकांची चारचाकी 232 व दुचाकी 456 वाहने गेली. गडाच्या वाहनतळावर वाहनांचे नियोजन करण्यात आले होते. सुरक्षारक्षकांनी घाट रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई केली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रथमच घाट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.

हेही वाचा

 

Back to top button