प्रचार रथांवर उमेदवारांसाठी ‘गारवा’; कुलर पंख्याची व्यवस्था | पुढारी

प्रचार रथांवर उमेदवारांसाठी ‘गारवा’; कुलर पंख्याची व्यवस्था

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सर्वच राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कुलर पंखे (टॉवर फॅन) असलेल्या प्रचार रथ तयार करण्यात येत आहेत. कुर्ला (पूर्व) येथे अशा प्रकारच्या प्रचार रथाचे काम सुरू आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून प्रचार यंत्रणेचे फंडे बदलले. लहान चारचाकी वाहने ही राजकीय पक्षाचे नाव, त्यांचे चिन्ह आणि उमेदवाराचे नाव व एलईडी स्क्रिन,स्टेरिओ साऊंड लावून गलोगल्ली प्रचारासाठी फिरताना दिसू लागली. आता प्रचाररथ मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत.

मुंबईत पाचव्या टप्प्यात 6 लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. इच्छुक उमेदवार मोठ-मोठे प्रचार रथ घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. सध्या मुंबईतील उन्हाचा तडाखा वाढला आहे. यापासून गारवा मिळावा म्हणून प्रचार रथावर कुलर पंखे बसविण्यात आले आहेत.या प्रचार रथाचे काम कुर्ला येथील उड्डाणपुलाखाली सुरू आहे. कुलर पंख्यासह दोन साऊंड सिस्टिम, तीन एलईडी लाईटही आहेत.

असा रथ तयार करणारे पंकज चव्हाण म्हणाले, मी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स 1990 च्या बॅचचा विद्यार्थी आहे. 2014 लोकसभा व विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीपासून आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार रथ तयार करण्याचे काम करतो. आम्ही नुसते फ्लेक्स लावून वाहन फिरवत नाही. आमच्या वाहनांवर काही ना काही शिल्परूपात असते. पण; यावेळेला उन्हाळा पाहून आम्ही प्रचार रथावर हिडन कुलर लावलेले आहेत.

उमेदवार प्रचाररथावर 3 तास उभा असतो. लोक चालत असतात. काही जण थंड पेय पितात, तर काही जण सावलीचा आधार घेतात.पण, असा दिलासा उमेदवारांना आणि त्यांच्यासोबत रथावर असणार्‍या कार्यकर्त्यांना मिळत नाही. हे लक्षात घेऊन रथावर तीन कुलर फॅन बसविण्यात आले आहेत.तसेच रात्रीच्या वेळेला प्रचार करता यावा याकरिता प्रचार रथावर एलईडी लावण्यात आले आहेत. या रथावर राजकीय पक्षाचे चिन्ह फायबरने तयार करून त्यामध्ये लाईट लावण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, बारामती येथेही कुलर पंख्याच्या प्रचार रथाला मागणी आहे.तिथेही अशाप्रकारचे काम सुरु आहे, असे पंकज चव्हाण म्हणाले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पासिंग

हे प्रचाररथ ताडदेव व वडाळा या दोन प्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी पाठविण्यात येतात. प्रशासनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे प्रचार रथ रस्त्यावर येतात. ही सर्व कामे डेकोरेशनवाले करतात,असे पंकज चव्हाण यांनी सांगितले.

Back to top button