सव्वा दोन कोटी रुपये असलेल्या व्हॅनचे नाट्य उघड; कागदपत्रे नसल्यामुळे गोंधळ | पुढारी

सव्वा दोन कोटी रुपये असलेल्या व्हॅनचे नाट्य उघड; कागदपत्रे नसल्यामुळे गोंधळ

भांडुप : पुढारी वार्ताहर : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भांडुपच्या सोनापूर जंक्शन येथे निवडणूक अधिकार्‍यांच्या भरारी पथकाने शनिवार दि. 27 रोजी रात्री दोन कोटी 25 लाख इतकी रोकड असणारी व्हॅन पकडली. तपासणीअंती ही व्हॅन एटीएममध्ये पैसे भरण्यास जात असल्याचे स्पष्ट झाले.

सुरुवातीला भरारी पथकाने संबंधित वाहन चालक आणि कर्मचार्‍यांना या रोकडबद्दल विचारले असता त्यानी ही बँकेची रोकड असल्याचे सांगितले. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या पथकाने या रोकडसह सदर व्हॅन आणि कर्मचार्‍यांना भांडुप पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनाही तत्काळ बोलविण्यात आले. या रोकडची मोजदाद करण्यात आल्यानंतर आयकर आणि पोलीस अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.

या वेळच्या चौकशीत रक्कम सिक्युअर या कंपनीची असून विविध बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम ही कंपनी करीत असल्याचे समोर आले. ही व्हॅन रक्कम घेऊन मुलुंड ते घाटकोपर विभागातील विविध एटीएम मध्ये भरण्यास जात होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने हा घोळ झाल्याचे कंपनी कर्मचार्‍यांनी जबाबात सांगितले.

याबाबत पोलीस आणि आयकर अधिकार्‍यांनी कंपनी आणि बँकेच्या अधिकार्‍यांचे जबाब नोंदविले आहेत. रविवारी दिवसभर ही चौकशी सुरू होती. ही रोकड बँकांची असल्याचे आणि अधिकृत असल्याची खात्री केल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी सांगितले. दरम्यान, ईशान्य मुंबईत आतापर्यंत बेहिशोबी 93 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले असून, घाटकोपर, मुलुंड, मानखुर्दमध्ये या कारवाया करण्यात आल्या आहेत.

Back to top button