खरिपात बियाण्यांचा गतवर्षापेक्षा अधिक पुरवठा : कृषी अधिकारी संजय काचोळेंची माहिती | पुढारी

खरिपात बियाण्यांचा गतवर्षापेक्षा अधिक पुरवठा : कृषी अधिकारी संजय काचोळेंची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे दोन लोख हेक्टरइतक्या विविध पिकांच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले असून 36 हजार 766 क्विंटल बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येईल. मागील खरीप हंगामात प्रत्यक्षात 30 हजार 689 क्विंटलइतक्या बियाणांची विक्री झाली होती. याचा विचार करता चालूवर्षी 6 हजार 77 क्विंटल जादा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाकडून (महाबीज) आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) मिळून 11 हजार 732 क्विंटल तर खासगी बियाणे कंपन्यांकडून 25 हजार 34 क्विंटलइतक्या बियाण्यांचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शिवाय घरचे बियाणे वापरामध्ये शेतकर्‍यांकडून प्राधान्याने सोयाबीन पिकाचे बियाणे वापरात येते. त्यामुळे बियाणांचा अधिक पुरवठा पेरण्यांसाठी होईल, असे चित्र आहे. पिकनिहाय स्थिती पाहता भात 15 हजार 600 क्विंटल, बाजरी 1600 क्विंटल, मका 4 हजार 50 क्विंटल, तूर 168 क्विंटल, उडीद 53 क्विंटल, मूग 363 क्विंटल, सोयाबीन 12 हजार 75 क्विंटल आणि इतर पिकांचे 2 हजार 857 क्विंटलइतक्या बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन असून सर्व प्रकारच्या बियाण्यांची मुबलक उपलब्धता होईल. दरम्यान, खरीपात खतांचा 2 लाख 12 हजार 100 टनाइतका मुबलक पुरवठा करण्याचे नियोजन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भात, सोयाबीन हीच मुख्य पिके

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामात भात हेच मुख्य पीक आहे. भात पिकाखाली सुमारे 60 हजार हेक्टरइतके सर्वाधिक क्षेत्र आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे 47 हजार 500 हेक्टर, बाजरी 36 हजार 560 हेक्टर, मूगाचे 15 हजार हेक्टर तसेच इतर कडधान्यांचे 8 हजार 500 हेक्टरइतके क्षेत्र आहे.

हेही वाचा

Back to top button