LokSabha Elections : सुनेत्रा पवारांना दौंडमधून मोठे मताधिक्य मिळेल : महायुतीला विश्वास | पुढारी

LokSabha Elections : सुनेत्रा पवारांना दौंडमधून मोठे मताधिक्य मिळेल : महायुतीला विश्वास

दौंड : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना दौंड तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार बुधवारी दौंड तालुक्याच्या दौर्‍यावर आहेत. दौंड तालुक्यातील खडकी येथून त्यांनी आपल्या दौर्‍याला सुरुवात केली. या दौर्‍यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले झाले. या सर्वांनीच सुनेत्रा पवार यांना मोठे मताधिक्य देऊ, असा निर्धार व्यक्त केला.

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच दौंड तालुक्यात संयुक्त दौरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख एकवटले आहेत. आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याने आता स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी या वेळी केले.

देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. विकासाला महत्त्व देणार्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी या वेळी केले. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात सामील होऊन विकासरथात सहभागी होऊन घड्याळाला अधिकाधिक मतदान करावे, असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे दौंड तालुक्यातील विविध गावांत उत्साहात स्वागत होत आहे.

हेही वाचा

Back to top button