दक्षिण मुंबई शिंदे गटाकडे जाण्याचे संकेत; भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी | पुढारी

दक्षिण मुंबई शिंदे गटाकडे जाण्याचे संकेत; भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला सुटणार असल्याचे जवळपास नक्की झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. इच्छुकांची समजूत घालताना नेत्यांची चांगलीच दमछाक होत असून गुरूवारी भाजप प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा हे शिवडीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कोणता सुवर्णमध्य काढला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मागील दोन निवडणुकांपासून ही जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. 2014 आणि 2019 मध्येही युतीच्या जागावाटपात भाजपला ही जागा शिवसेनेला सोडावी लागली होती. यंदा शिंदे गटाकडून ही जागा आपल्याला मिळेल, असा भाजप कार्यकर्त्यांना विश्वास होता. शिवाय, लोढा आणि नार्वेकरांच्या प्रचारामुळे तशी खात्रीही व्यक्त करण्यात येत होती. मात्र, भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा ही जागा मित्रपक्षाला सोडण्याची भूमिका घेतल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. प्रचाराला सुरूवातही केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही 16 जागा लढणार असल्याचे सांगत दक्षिण मुंबईवरील दावा कायम ठेवला. आता जागा शिंदेंकडे जाणार आहे.

Back to top button