कोट्यांतर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्तच; माहिती अधिकारात उघड | पुढारी

कोट्यांतर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्तच; माहिती अधिकारात उघड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावीसाठी राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेशात व्यवस्थापन, अल्पसंख्याक, इनहाउस अशा विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शून्य ते शेवटच्या फेरीपर्यंत संधी दिली जाते. परंतु, कोट्यांतर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत असल्याचे उघडकीस आले आहे. म्हणूनच आता विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्तेवर आधारितच व्हावेत आणि विविध प्रकारच्या कोट्यांतर्गत प्रवेश नियमित प्रवेश फेर्‍यांपूर्वी राबविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

व्यवस्था सुधारणा मोहीम (सिस्कॉम) यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2023-24 दरम्यान राबविलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विविध कोट्यांंतर्गत प्रवेशाचा तपशील माहिती अधिकारात मागविण्यात आला. त्यात विविध कोट्यांंतर्गत 100 टक्के जागा भरल्या जात नसल्याचे दिसून आले. या प्रक्रियेत एकूण प्रवेशक्षमतेच्या कोट्यातील प्रवेशासह केवळ 70 टक्के जागा भरल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये 100 टक्के प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांची संख्या 10 टक्के देखील नाही. याउलट शून्य ते 20 टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या विभाग आणि माध्यमांची संख्या 30 ते 35 टक्के आहे.

यामध्ये अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा देखील समावेश आहे. शून्य ते 20 टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात बरेचसे विभाग हे ’एचएसव्हीसी’चे आहेत. व्यवस्थापन स्तरावरील कोट्यात उपलब्ध जागांपैकी सरासरी 50 टक्के, इनहाउस कोटा 35 ते 40 टक्के, अल्पसंख्याक कोटा 35 ते 40 टक्के जागा भरल्या आहेत. उर्वरित जागा रिक्त राहत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत विविध कोट्यांंतर्गत प्रवेश हे नियमित प्रवेशापूर्वी राबविण्यात यावे आणि गुणवत्तेनुसार प्रवेशात संधी मिळावी, अशी मागणी ’सिस्कॉम’च्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button