LokSabha Elections | हाय व्होल्टेज लढतीकडे परदेशी माध्यमांचेही लक्ष.. | पुढारी

LokSabha Elections | हाय व्होल्टेज लढतीकडे परदेशी माध्यमांचेही लक्ष..

बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशातील काही लोकसभेच्या तुल्यबळ लढतीत यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथे नणंद विरुद्ध भावजय अशी हाय व्होल्टेज निवडणूक होत आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय कस या निवडणुकीत लागणार असल्याने या लढतीकडे परदेशी माध्यमांचेही लक्ष आहे. थेट न्यूयॉर्क टाइम्सचे प्रतिनिधी बारामती व मतदारसंघातील अन्य भागात फिरून निवडणुकीचे वार्तांकन करत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा प्रथमच तुल्यबळ लढत होत आहे. यापूर्वीच्या बहुतांश लढती एकतर्फीच होत होत्या. बारामतीच्या मैदानात पवारांना हरविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. परंतु, पवार विरोधकांना त्यात यश आले नाही. पवारांना नामोहरम करण्यासाठी अनेक दिग्गजांच्या सभा बारामतीत झाल्या. परंतु, पवारांची या मतदारसंघावरील पकड मजबूतच राहिली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पवारांचा पराभव करण्यासाठीच पवारच मैदानात उतरले आहेत.

शरद पवारांकडूनही उल्लेख

बारामतीच्या या लढतीकडे जगभराचे कसे लक्ष लागले आहे, याचा उल्लेख शुक्रवारी शरद पवार यांनी केला. उत्सुकतेपोटी अमेरिकेतील पत्रकार बारामतीत दाखल झाले आहेत. बारामतीकर काय करणार याची उत्सुकता त्यांना आहे. पण त्यांना हे माहीत नाही की, बारामतीकर जिथे शिकवायचा आहे तिथे धडा शिकवतात, जिथे ठोस काम करायचे तिथे करतात, या शब्दात पवार यांनी बारामतीकरांचे कौतुक केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे प्रतिनिधी मतदारसंघाचा आढावा घेत असल्याचे सांगितले.

हेही वाचा

Back to top button