पुणे : तापमानवाढीमुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे येत्या सोमवारपासून (दि.22)विद्यार्थ्यांनी उन्हाचा तडाखा पाहूनच शाळेत उपस्थित रहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत उपस्थित राहण्याबाबत विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शाळेतील उपस्थितीबाबत सवलत देण्याच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालकांनी सादर केलेल्या प्रस्तावाला शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिल्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी प्रसिद्ध केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना 22 एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्यात येत आहे. तसेच राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याच्या अनुषंगाने शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. या सूचनांचे पालन होण्याबाबतची दक्षता प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक यांनी घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा