वातावरणातील बदल नागरिकांना मानवेना : शेतकरीवर्गाचीही चिंता वाढली | पुढारी

वातावरणातील बदल नागरिकांना मानवेना : शेतकरीवर्गाचीही चिंता वाढली

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या आठ दिवसांपासून कधी ढगाळ वातावरण, दुपारी उन्हाचा तडाखा, रात्री प्रचंड उकाडा जाणवत आहे. या संमिश्र वातावरणामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे शेतकर्‍यांना अशा वातावरणामुळे काळजी लागल्याचे दिसून येत आहे. मार्च महिना अर्ध्यावर आला असता कडक उन्हाळा जाणवू लागला होता. त्यानंतर मात्र उष्णतेची लाट कायम राहिली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. परिणामी, उष्णतेच्या झळा, रात्री उकाडा कायम राहत असल्याने नागरिकांना असह्य झाले आहे. फॅन, कुलरचादेखील या उष्णतेपुढे उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कधी ढगाळ वातावरण होत असल्याने आजारांनीदेखील डोके वर काढले आहे. रुग्णालयांत रुग्णांची संंख्यादेखील वाढू लागली आहे. दुसरीकडे पाणीटंचाई, चाराटंचाई असे प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावू लागले आहेत. तर ढगाळ वातावरणामुळे अवकाळीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेकांच्या शेतातील ऊस, कांदा, भुईमूग, बाजरी ही पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. तर काहींनी जगवलेली पिके हाता-तोंडाशी आली असताना अवकाळीच्या भीतीने ती काढण्यासाठीची घाई सुरू केली आहे. मात्र, पिकांच्या काढणीसाठी मजूरही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गापुढील अडचणी वाढता वाढतच आहेत.

15 दिवसांनंतर घोड नदी कोरडीठाक

सध्या शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भीमा नदीला पाणी आहे. परंतु वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे पाणी असूनदेखील पिकांना पाणी देता येत नाही. दुसरीकडे घोड नदीपात्रामध्ये महिन्यापूर्वी चिंचणी धरणातून पाणी सोडले होते. परंतु पाण्याची पातळी पुन्हा खालावली असून, 15 दिवसांनंतर पुन्हा घोड नदी कोरडीठाक पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button