“वर्षातून एकदा फोन करेन…” : वडिलांना मेसेज करुन कोटातील NEET परीक्षार्थी बेपत्ता | पुढारी

"वर्षातून एकदा फोन करेन..." : वडिलांना मेसेज करुन कोटातील NEET परीक्षार्थी बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मला पुढे शिकण्‍याची इच्‍छा नाही. माझ्‍याकडे ८ हजार रुपये आहेत. मी पाच वर्षांसाठी घर सोडत आहे. कृपया आईला सांगा माझी काळजी करु नकोस. वर्षातून एकदा फोन करेन, असा मेसेज वडिलांना पाठवून राजस्‍थानमधील कोटा शहरातून १९ वर्षीय NEET परीक्षार्थी राजेंद्र मीना बेपत्ता झाल्‍याचे वृत्त ‘एनडीटीव्‍ही’ने दिले आहे. त्‍याचे वडील जगदीश मीणा यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.

कोणतेही चुकीचे पाऊल उचलणार नाही…

आपल्‍या वडिलांना राजेंद्र पाठवेल्‍या मेसेजमध्‍ये म्‍हटलं आहे की, “माझ्याजवळ आठ हजार रुपये आहेत. पुढील पाच वर्षांसाठी मी घर सोडत आहे. हा मेसेज तुम्‍हाला पाठविल्‍यानंतर मी माझा मोबाईल विकून सिम कार्ड तोडून टाकीन. कृपया आईला सांगा की माझी काळजी करू नका. मी कोणतेही चुकीचे पाऊल उचलणार नाही. माझ्याकडे सर्वांचे नंबर आहेत. गरज पडली तर वर्षातून एकदा नक्की फोन करेन.”

राजेंद्रच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा ६ मे रोजी बेपत्ता झाला. तो दुपारी दीड वाजता कोटा येथील पेइंग गेस्टच्या निवासस्थानातून बाहेर पडला होता. त्याचा निरोप आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत राजेंद्र बेपत्ता झाल्‍याची तक्रार दाखल करण्यापूर्वी त्याचा शोध घेण्‍यास सुरुवात केली. राजेंद्रचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. त्‍याच्‍या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

पुन्‍हा एकदा कोटा शहर चर्चेत

राजस्‍थानमधील कोटा शहर हे आयआयटी जीईई ( IIT JEE) आणि नीट ( NEET ) या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठी देशातील कोचिंग हब म्हणून ओळखले जाते. परीक्षेच्‍या अभ्‍यासाच्‍या तणावातून कोटामध्ये या वर्षी आठ कोचिंग विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. आता NEET परीक्षार्थी राजेंद्र मीना बेपत्ता झाल्‍याने कोटाच्या येथील स्पर्धात्मक कोचिंग वातावरणात विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणारे ताण आणि दडपण याची पुन्‍हा पुन्‍हा सुरु झाली आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button