उन्हाच्या झळा : ऊसतोड मजुरांच्या जिवाची लाहीलाही | पुढारी

उन्हाच्या झळा : ऊसतोड मजुरांच्या जिवाची लाहीलाही

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचा सर्वाधिक त्रास ऊसतोड मजुरांना सहन करावा लागत आहे. भर उन्हात ऊसतोडीसह वाहतूक करावी लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यापुढे ऊन काहीच नसल्याचे हे मजूर सांगत आहेत. अक्षरशः सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. अशा कडक उन्हामध्ये ऊसतोड मजूर जिवावर उदार होऊन ऊसतोडीसह कारख्यान्यात वाहतूक करीत आहेत. अनेक जण भल्या पहाटे फडात जात ऊसतोड करीत आहेत. या वेळी बिबट्याच्या हल्ल्याचा धोकाही ते पत्करत आहेत. परंतु ‘रोजच मढं, त्याला कोण रडं’ अशी परिस्थिती असल्याने ते ही भीती मनात ठेवून ऊसतोड करीत आहेत.

सध्या कडक उन्हाचा मजुरांना मोठा त्रास होत आहे. लहान मुलांचेही मोठे हाल होत आहेत. ऊसतोडीसह त्याची शेतातून बांधापर्यंत वाहतूक करणे, पुढे कारखान्यापर्यंत ऊस बैलगाडीतून नेणे आदी कामे उन्हातच करावी लागत आहेत. अनेकदा डांबरी रस्त्यावरून जाताना बैलांनाही उष्माघाताचा त्रास होत आहे. अनेक मजूर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून उसाने भरलेल्या गाडीवर छोटेसे छत करीत आहेत. मात्र, उकाड्याचा त्रास व्हायचा तेवढा होत आहे.

हेही वाचा

Back to top button