मतदानाच्या कामांसाठी दळणवळण आराखडा करा; जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना | पुढारी

मतदानाच्या कामांसाठी दळणवळण आराखडा करा; जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक प्रक्रियेसाठी सविस्तर दळणवळण आराखडा तयार करून मतदान, सुरक्षाव्यवस्था आणि आपत्तीच्या दृष्टीने विविध पैलूंचा समावेश दळणवळण आराखड्यात करावा. जेणेकरून प्रत्येक काम वेगाने पूर्ण होईल. ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या मतदानासाठीच्या व्यवस्थेचाही या आराखड्यात विचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निवडणूक समन्वय अधिकार्‍यांच्या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला, त्या वेळी डॉ. दिवसे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेसाठी दळणवळण आराखडा सूक्ष्मरीतीने तयार करून त्यात विविध जबाबदार्‍या पार पाडताना प्रभावी संवादासाठी आवश्यक प्रक्रिया निश्चित करावी. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले आहे, त्यांचे प्रशिक्षण योग्यरीतीने करण्यात यावे. मतदार यादीशी संबंधित कामे वेळेवर करण्यात यावी. नियंत्रण कक्षाकडे येणार्‍या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. मतमोजणी केंद्राचा आराखडा, सुरक्षाव्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांचे मतदान, मतदान साहित्य वितरण, मतदान कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रातील सुविधा, टपाली मतदान, सी-व्हिजील अ‍ॅपवरील तक्रारी, निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदी विविध विषयांचा या वेळी आढावा घेण्यात आला.

हेही वाचा

Back to top button